शिवाजी गोरे--दापोली -कोकणच्या भूमीने देशाला पाच भारतरत्ने दिली. कोकणभूमी भारतरत्नांची खाण म्हणून ओळखली जाते. या भूमीत अनेक नररत्न होऊन गेली. मात्र, ज्या भूमीत नररत्नांचा जन्म झाला ती भूमी अजूनही दुर्लक्षित आहे. भारतरत्नांच्या या मायभूमीत त्यांची उपेक्षाच होत असल्याचे दिसून येत आहे. कोकणच्या लाल मातीत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील पेढे परशुराम येथे ७ मे १८८० रोजी पांडुरंग वामन काणे या भारतरत्नाचा जन्म झाला. त्यांचे काही काळ दापोली येथे वास्तव्य होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण दापोलीच्या ए. जी. हायस्कूल येथे झाले. या महान भारतरत्नाने आपल्या कर्तृत्वाने आपली ओळख संपूर्ण जगाला करुन दिली. परंतु, या भारतरत्नाचा मायभूमीलाच विसर पडल्याचे विदारक चित्र कोकणात पहायला मिळत आहे. सरकारने पा. वा. काणे यांना भारतरत्न देऊन गौरव केला, पण त्यांच्या गावी त्यांच्या स्मृती जतन करण्याच्या दृष्टीने आजतागायत कोणतीच पावले उचलली नाहीत.महर्षी धोंडो केशव कर्वे, गोविंद वल्लभपंत, डॉ. भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर, पांडुरंग वामन काणे आणि सचिन तेंडुलकर ही सर्व ‘भारतरत्ने’ कोकणच्या लाल मातीचे सुपुत्र. कोकणच्या लाल मातीतील हे भूमिपूत्र आपल्या कर्तृत्वाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करुन महान झाले. देशाने सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ देऊन त्यांचा गौरवही केला. मात्र, सरकारने त्यांच्या मूळ गावांकडे फारसे लक्ष न दिल्यामुळे त्यांची गावे प्रकाशझोतात आलेली नाहीत. परंतु, लोकांना मात्र त्यांच्या गावाबद्दल प्रचंड आकर्षण आहे. त्यांचे गाव, घर, परिसर, त्या भागातील माणसे, त्यांचे राहणीमान, भारतरत्नांचे वंशज काय करतात, ते वंशज कोण आहेत, कसे आहेत, भारतरत्नांचा वारसा कोण चालवतो याबद्दल अनेक प्रश्न लोकांना पडतात. त्यांच्या कामाचे प्रतिबिंब कोकणभूमीत पडण्यासारखे एकही ठोस काम त्या गावात झालेले दिसत नाही.भारतरत्नांच्या या कोकणभूमीत त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी अशा स्वरुपाचे अपेक्षित काम सरकारकडून झालेले नाही. त्यांच्या कार्याची सर्वसामान्य नागरिकाला जाणीव व्हावी असे काम सरकारकडून होणे गरजेचे आहे. थोर पुरुषांचा वारसा सांगणाऱ्या या भूमीतील पुढील पिढीला आपल्या पूर्वज नररत्नांची ओळख होणे गरजेचे आहे. त्यांचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांच्या कार्याची सदैव प्रेरणा होत राहणे गरजेचे आहे. तरच पुढील पिढीला पूर्वजांच्या कार्याची जाणीव होईल. मात्र, एकाही भारतरत्नाच्या गावातील कामाची दखल घ्यावी असे ठोस काम सरकारकडून झालेले नाही.धर्मशास्त्र आणि काव्य शास्त्राचे आंतरराष्ट्रीय कार्य विद्वान, विख्यात, प्राच्यविद्या संशोधक, महामहोपाध्याय अशी ख्याती पां. वा. काणे यांनी प्राप्त केली होती. दापोली येथे प्राथमिक शिक्षण व उच्च शिक्षण मुंबई येथे त्यांनी पूर्ण केले. एम. ए., एल. एल. एम. या पदव्या संपादन करणारे काणे यांनी शैक्षणिक जीवनात ‘भाऊ दाजी लाड’ पारितोषिक पटकावले होते. दक्षिणा फेलोशिप, वेदांत पारितोषिक, मंडलीक सुवर्णपदक, स्प्रिंगर शिष्यवृृत्ती यासारखे पारितोषिक व सन्मान प्राप्त केले होते. प्रत्येक परीक्षेत असाधारण प्राविण्य हा त्यांचा विशेष गुण होता.पां. वा. काणे यांनी समाज सुधारणा व धर्मशास्त्र या दोन क्षेत्रात असामान्य कर्तृत्व गाजवले. विपुल ग्रंथलेखन करुन आपले नाव त्यांनी उज्ज्वल केले. यातून त्यांची साहित्य विविधता, सखोलता व विस्तारीत व्याप्ती दिसून येते. धर्मशास्त्राचा इतिहास हा पंचखंडात्मक संशोधन ग्रंथ आणि संस्कृत अलंकार (साहित्य) शास्त्राचा इतिहास या ग्रंथामुळे त्यांना जागतिक कीर्ती मिळाली. इतकेच नव्हे तर त्यांनी पूर्वमीमांसा, धर्मसूत्र, काल्यायन स्मृती, हिंदू कायद्याचा वैदिक मुलाधार, ज्ञानेश्वरांचे पूर्वसुरी अशा विविध विषयांवरही अभ्यासपूर्ण लेखन केले. साहित्य दर्पण, कादंबरी, उत्तररामचरित, हर्षचरित, व्यवहारमयूर हे ग्रंथ त्यांनी संपादित केले.धर्मशास्त्र, पुराणे यासारख्या विषयावर लेखन केल्यामुळे ते जुनाट विचारांचे आहेत, असे अनेकांना वाटत होते. परंतु, त्यांच्या विचारसरणीत जुन्या - नव्याचा सुरेख समन्वय होता. त्यांची धार्मिक व सामाजिक दृष्टी पुरोगामी होती. त्यांनी समाज सुधारणेच्या संदर्भात दुर्बल व सीमारेषेवरील स्त्रीवर्गावर, त्यांच्या सुधारणेवर व अस्पृश्यांच्या हक्क प्राप्तीवर आपले लक्ष केंद्रित केले होते.लोणावळ्याच्या धर्मनिर्णय मंडळाने चालवलेल्या हिंदू धर्मसुधारणेच्या चळवळीत ते मनापासून सहभागी झाले होते. विधवांना मिळणारी शोचनीय वागणूक व अस्पृश्यतेवर त्यांनी टीका केली. अस्पृश्यता, केशवपन, समाजातील अनिष्ट चालीरितींचा निषेधही त्यांनी केला होता. समाजातील आंतरजातीय विवाह, विधवा विवाह व घटस्फोट यांना ते पाठिंबा देत होते. प्राचीन ग्रंथांबाबत त्यांची दृष्टी बुद्धीवादी व टीकात्मक होती. धार्मिक विचारात - आचारात काळाप्रमाणे योग्य ते बदल झाले पाहिजेत, असे त्यांना वाटत होते. पांडित्यांच्या चौकटीत न बसणारी पुरोगामी दृष्टी हे काणे यांचे वैशिष्ट्य होते. हिंदू कायद्याची नव्याने पुनर्रचना व्हावी यासाठी तसेच विधवा विवाहाचा पुरस्कारही त्यांनी केला. तर सकेशा विधवेला पंढरपुरातील विठ्ठल पुजेचा अधिकार देण्यासाठी वकीलपत्र स्वीकारुन त्यांनी आपला दूरदृष्टीकोन समाजापुढे मांडला. हिंदू समाजाची पुनर्रचना लोकशाही, राष्ट्रवाद, विश्वबंधुत्व या तत्वांच्या आधारावर झाली पाहिजे, असे त्यांना वाटत होते. त्यासाठी त्यांनी सातत्याने आपले विचार जगासमोर ठेवले. पण त्यांचे गाव जगासमोर ठेवण्याइतके बनवण्यात मात्र सरकार कमी पडले आहे.भारतरत्न पा.वा. काणे यांच्या पेढे परशुराम या जन्मगावातच पुढील पिढीला त्यांची फारशी ओळख नाही. गावातील अनेक ग्रामस्थांना प. वा. काणेंबद्दल माहिती नसल्याचे निदर्शनास आले आहे. या गावात पर्यटकांनी भेट दिल्यानंतर काणे यांच्या वास्तव्याबद्दल आपुलकीने विचारपूस केली असता पा. वा. काणेंबद्दल आपल्याला काहीही माहिती नसल्याचे अनेक ग्रामस्थ सांगतात. भारतरत्नांच्या गावातील पुढील पिढीला त्यांच्याबद्दल माहिती करुन देणे किंवा त्यांच्या मूळ गावात स्मारक उभारुन त्यांच्या कार्याची संग्रहीत माहिती देणे, त्यांच्या गावाला व पंचक्रोशीला जाणीव होईल असा विकास करणे ही सरकारचीच नैतिक जबाबदारी आहे. ग्रामस्थांना त्यांच्या कर्तृत्वाची ओळख करुन देणे ही जबाबदारीही शासनाची आहे.भारतरत्नांच्या गावांना विश्ोष दर्जा दिल्याने ही गावे आदर्श होतील. कारण भारतरत्नांच्या गावांकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागलेल्या असतात. त्यांच्या गावांची दुरवस्था पाहून त्यांचे अनेक अनुयायी निराश होतात. भारतरत्नांच्या गावाला भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना पुरेशा सुविधा पुरवायला हव्यात. भारतरत्नांच्या नावलौकिकाला शोभेल असा गाव बनवणे गरजेचे आहे. तरच ती या भारतरत्नांना खरी श्रद्धांजली ठरेल. मात्र, त्यादृष्टीने कोणत्याही सरकाने अद्यापही प्रयत्न केलेले दिसून येत नाहीत. हे प्रयत्न झाल्यास ही गावे प्रकाशझोतात येण्यास वेळ लागणार नाही.धर्मशास्त्र आणि काव्यशास्त्र केंद्रबिंदू मानून स्त्री सुधारणा, अस्पृश्यता निवारण या बाबींना महत्व देऊन संपूर्ण आयुष्य त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी खर्ची घातले. अशा या महामानवाच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या अतुलनीय कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने १९६३ साली ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान देऊन सन्मानित केले. अशा या महापुरुषाचे १८ एप्रिल १९७२ रोजी निधन झाले.
काणे यांच्या वाट्यालाही उपेक्षारत्नच!
By admin | Published: November 20, 2015 11:15 PM