मुंबई : कोरोनाशी लढाई एकीकडे तीव्र होत असताना राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांच्या मजुरांवरील रेल्वे प्रवासावरून वाक्युद्ध काही संपण्याचे नाव घेत नाहीय. मजुरांचे ८५ टक्के रेल्वे भाडे हे केंद्र सरकार भरते असा दावा भाजपाकडून करण्यात आला होता. यावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी टीका करताना भाजपाचा खोटारडेपणा असून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती. यावर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी प्रत्त्यूत्तर दिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून केंद्र आणि राज्य सरकार रेल्वे प्रवास आणि मजुरांच्या प्रश्नावर आमनेसामने आले होते. यावरून आरोप प्रत्यारोप होत होते. भाजपाच्या दाव्यावर सचिन सावंत यानी जगातील सगळ्यात खोटारडा पक्ष म्हणून भाजपाचे नाव गिनीज बुक मध्ये सामिल व्हावे, असा टोला लगावला होता. यावर शेलार यांनी कुठल्याही अभ्यासाअभावी सचिन सावंत यांचे नाव सर्वाधिक खोटारडी प्रेसनोट काढणार्या यादीत आता अव्वल क्रमांकावर येत आहे, सचिन सावंत हे खोटे बोलण्याची फँक्टरी आहे, अशी टीका केली आहे.
याचबरोबर सचिन सावंत हे पक्षात ‘उपेक्षित’ जरूर आहेत, पण त्यांनी प्रवक्तेपदासाठी ‘अपेक्षित’ अभ्यास करूनच बोलावे, असा टोलाही हाणला आहे. एक रेल्वे चालविण्यासाठी खात्याला ३० ते ५० लाखांचा खर्च येत असतो. याचे गणित एसीचे तीन आणि स्लिपर क्लासमध्ये विभागण्यात येते. स्लिपरचे तिकिट हे अनुदानावरच असतात. हा दर १५ टक्के आकारला जातो. यामुळे केंद्र आणि राज्याला तिकिटासाठीचे प्रमाण हे अनुक्रमे ८५ आणि १५ टक्के आहे, असे शेलार म्हणाले.
सचिन सावंत यांनी यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीचा दाखला दिला होता. यावरही शेलार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. न्यायालयात एक रेल्वे चालविण्यासाठी खर्च किती येतो, यावर युक्तीवाद होत नाही. कारण या गोष्टी तेथे उपस्थित असलेल्यांना माहिती असतात. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी हेच सांगितले, की तिकिटाचे दर हे राज्य सरकारकडून घेण्यात येत आहेत. पण त्याचे प्रमाण १५ टक्के आहे. शिवाय मजुरांना त्यांच्या राज्यात सोडल्यानंतर ही रेल्वे रिकामीच परतत आहे. यामुळे सावंत हे ‘उपेक्षित’ जरूर आहेत, पण ‘अपेक्षित’ अभ्यास करूनच बोलावे, असा टोला शेलारांनी लगावला.
अन्य महत्वाच्या बातम्या...
छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन
कर्नाटकात पुन्हा राजकीय संकट? येडीयुराप्पांविरोधात २० आमदार बंडाच्या पवित्र्यात
Lockdown 5: मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मोदी-शहांमध्ये महामंथन; 1 जूनपासून पुढे काय?
अमेरिकेचा जगातील सर्वांत मोठा युद्धसराव; भारतही सहभागी होणार