मुंबई: शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे अपघाती निधन झाल्यानंतर अवघा महाराष्ट्र हळहळला. विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूबाबत दररोज समोर येणाऱ्या नवनव्या माहितीमुळे या प्रकरणातील संशयाचे धुके आणखीनच गडद होत चालले आहे. अशातच आता विनायक मेटे यांचे भाचे बाळासाहेब चव्हाण यांनी केलेल्या दाव्यांमुळे पुन्हा खळबळ उडाल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात घडला त्या दिवशी टोलनाक्यावरून गाडी गेली होती त्यामध्ये विनायक मेटे दिसत नव्हते, असा दावा मेटे यांच्या भाच्याने केला आहे. यावेळी बाळासाहेब चव्हाण यांनी मेटेंच्या गाडीचा चालक एकनाथ कदम यांच्यावरही संशय व्यक्त केला. मेटे यांचा अपघात झाल्यानंतर ड्रायव्हर एकनाथ कदम यांनी फोनवर चुकीची माहिती दिली. ज्या दिवशी विनायक मेटे यांचा अपघात झाला होता, त्या वेळेस मी आणि शिवसंग्रामचे प्रवक्ते तुषार काकडे हे गांधी मेमोरियल हॉस्पिटलच्या दिशेने निघालो होतो, असे बाळासाहेब चव्हाण यांनी सांगितले.
ड्रायव्हर आणि सुरक्षारक्षक यांना काहीही झाले नाही
माझ्या परिचयातील एका व्यक्तीला फोन केला. त्याने मला सांगितले की, ड्रायव्हर आणि सुरक्षारक्षक यांना काहीही झाले नाही, मात्र विनायक मेटे यांनी जागी प्राण सोडला आहे. हे समजल्यानंतर मी ड्रायव्हर एकनाथ कदम यांना फोन केला होता. ते बोलले की साहेब बरे आहेत, साहेबांना काही झाले नाही, मी २० मिनिटे साहेबांसोबत बोलतोय, ते व्यवस्थित आहेत, अशी माहिती ड्रायव्हर एकनाथ कदम यांनी दिली. मात्र, मी विनायक मेटे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी फोन उचलला नाही, त्यामुळे ड्रायव्हर एकनाथ कदम यांच्या बोलण्याबाबत काय समजायचे? असा सवाल बाळासाहेब चव्हाण यांनी उपस्थित केला.
दरम्यान, पोलिसांकडून सध्या चालक एकनाथ कदम याची कसून चौकशी केली जात आहे. मात्र, चौकशीत तो सतत जबाब बदलत असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे विनायक मेटे यांच्या गाडीला धडक देणाऱ्या ट्रक चालकाला समोर बसवून या दोघांची चौकशी केली जाणार होती. परंतु, या चौकशीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी या सगळ्याबाबत संशय व्यक्त केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणाची चौकशी सीआयडीकडे देण्यासंदर्भात सूतोवाच केले होते.