मुंबई : माथेरान (Matheran)पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तब्बल तीन वर्षानंतर आजपासून (22 ऑक्टोबर) नेरळ ते माथेरान अशी मिनी ट्रेनची (Neral-Matheran Mini Train) सेवा सुरू झाली आहे. आज सकाळी पहिली ट्रेन नेरळ स्थानकातून रवाना झाली. सकाळी आठ वाजून 50 मिनिटांनी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही ट्रेन सकाळी 11.30 वाजता माथेरानला पोहोचणार आहे.
माथेरान हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिलस्टेशन (Hill Station) पैकी एक आहे. पावसाळा-हिवाळा या ऋतुत पर्यटक माथेरानला मोठ गर्दी करतात. त्यामुळे माथेरान ते नेरळ या मिनी ट्रेनची सर्वांना प्रतिक्षा होती. अखेर तीन वर्षात्या प्रतिक्षेनंतर सेवा सुरू झाली आहे. ही सेवा सुरु झाल्यामुळं प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. माथेरान ते नेरळ ही मिनी ट्रेन सेवा नोव्हेंबरपर्यंत रुळावर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. अखेर ऑक्टोबरमध्येच ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, 2019 मध्ये माथेरानमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नेरळ ते माथेरान दरम्यानच्या डोंगर भागातील रेल्वे रुळांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून नेरळ-माथेरान मार्ग बंद होता. तर अमन लॉज ते बाजारपेठ मार्गावर शटल रेल्वे सुरु होती. गेल्या अनेक दिवसापासून रुळ बदलण्याचे काम सुरु होते. अखेर हे सर्व काम आता पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण होताच नेरळ ते माथेरान मिनी ट्रेनची चाचणी केल्यानंतर आजपासून सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.