ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - बस्स, दो मिनिटं, म्हणत लहानथोरांच्या जिभेवर रेंगाळणारी मॅगी नुडल्सची चव ग्राहकांना आजपासून पुन्हा चाखता येणार असून 'नेस्ले'ने ग्राहकांना दिवाळीची भेट देत आजपासून मॅगी बाजारात विक्रीस उपलब्ध करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मॅगी खाण्यासाठी १०० टक्के सुरक्षित असून याच महिन्यात मॅगी नुडल्स किरकोळ दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होतील, असे नेस्ले कंपनीने गेल्या आठवड्यात स्पष्ट केले होते, त्यानुसार आजपासूच बाजारात मॅगीची विक्री होणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, नेस्लेच्या नानजानगुड(कर्नाटक), मोगा(पंजाब) आणि बिछोलीम (गोवा) येथील कारखान्यांमध्ये तयार होणाऱ्या मॅगी नुडल्सचे सर्व नमुने प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या सर्व चाचण्यांमध्ये मॅगी नुडल्स यशस्वी ठरली आहे. मॅगी खाण्यासाठी १०० टक्के सुरक्षित असल्याचा अहवाल आम्हाला मिळाला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केल्यानंतर आता याच महिन्यात मॅगी नुडल्स मसाला विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचे आमचे प्रयत्न आहेत, असे नेस्लेने गेल्या आठवड्यात (बुधवार) म्हटले होते.
नेस्ले इंडिया कंपनीच्या ‘टू मिनिट्स मॅगी नूडल्स’वर केंद्र आणि राज्य सरकारने घातलेली बंदी मुंबई उच्च न्यायालयाने ऑगस्ट महिन्यात सशर्त उठवली होती. या नूडल्सच्या नमुन्यांची पुन्हा चाचणी करून घ्यावी व त्यातून हे खाद्यान्न सेवनासाठी अपायकारक नाही असे निष्पन्न झाले तरच कंपनीला हे उत्पादन पुन्हा विक्रीसाठी बाजारात आणता येईल, असे न्यायालयाने म्हटले होते. मोहाली (पंजाब), हैदराबाद व जयपूर येथील प्रयोगशाळांमध्ये मॅगी नूडल्सची प्रत्येकी पाच सँपल्स चाचणीसाठी पाठवण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. त्यानुसार या तिनही प्रयोगशाळांमध्ये मॅगीच्या नमून्यांची चाचणी करण्यात आली असून ती सुरक्षित आहे, असे कंपनीतर्फे जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले.