मुंबई : परराज्यात आलिशान गाड्यांची नोंदणी करून कर चुकवत मुंबईत वाहन चालवणाऱ्या कारमालकांवर आरटीओकडून धडक कारवाई करण्यास जानेवारी महिन्यापासून सुरुवात झाली आहे. यातून बॉलीवूडमधील सेलीब्रेटीही सुटू शकलेले नाहीत. ४0 लाखांचा वाहन कर चुकवल्याप्रकरणी नावाजलेल्या कॅसेट कंपनीच्या मालकाविरोधातही कारवाई करण्यात आली आहे. त्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्र सोडता काही राज्यांत वाहन कर हा जवळपास ५ टक्के आहे. महाराष्ट्रात हाच कर जवळपास २० टक्के एवढा आहे. कमी कर असणाऱ्या राज्यात वाहन नोंदणी केल्यानंतर, कर चुकवून ही वाहने महाराष्ट्रात चालविली जातात. अशा वाहनांविरोधात राज्याच्या परिवहन विभागाकडून कारवाई केली जाते. अशा वाहनांविरोधात आणि त्यांच्या मालकांविरोधात जानेवारी महिन्यापासून कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत तर ही कारवाई मोठ्या प्रमाणात केली जात आहे़ बॉलीवूड सेलीब्रेटीही आरटीओच्या जाळ्यात अडकत आहेत. बॉलीवूडमधील एका नामवंत कंपनीच्या कॅसेट मालकाच्या वाहनांवरही आरटीओच्या भरारी पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे. अंधेरीतील मेट्रोजवळील अपना बाझार येथे करण्यात आलेल्या कारवाईत मर्सिडीज एस ५00 ही गाडी पकडण्यात आली. या गाडीची पाँडेचेरी येथे नोंदणी करण्यात आली आहे. तिची किंमत सुमारे २ कोटी रुपये आहे़ त्याचा जवळपास ४0 लाख रुपये कर चुकवण्यात आल्याचे सांगितले जाते. अशाच प्रकारची कारवाई नुकतीच अंधेरी आरटीओकडून करण्यात आली होती. रेंज रोवर असलेल्या आलिशान गाडीची नोंद ही सिक्कीममध्ये करण्यात आली होती़ (प्रतिनिधी)>एका कॅसेट कंपनीच्या मालकाविरोधात वाहन कर चुकवल्याप्रकरणी अंधेरी आरटीओकडून कारवाई करण्यात आली आहे. परराज्यात वाहन नोंदणी करून कर चुकवला जातो. अशा वाहन आणि मालकाविरोधात कारवाई करण्यात येत आहे. - गोविंद सैदाणे, अंधेरी प्रादेशिक परिवहन अधिकारी, अतिरिक्त कार्यभार
बॉलीवूड आरटीओच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2017 1:53 AM