मुंबई : उगाच अमाप सांगायचं अन् नंतर उताणं पडायचं असं आमचं नाही. आम्ही जे करतोय ते जनतेला दिसतंय, त्यांचा विश्वास आहे; पण विरोधकांना निव्वळ पोटदुखी झाली असल्याने दिसत नसावं. ज्यांचं वय सहा ते अठरा वर्षांदरम्यान असेल तर त्यांनाही आमची कामं दिसावीत म्हणून चष्मे देऊ. भाजपच्या राज्यांमधील कायदा-सुव्यवस्थेचं काय? आधी स्वत:च्या बुडाखाली बघा, असा हल्लाबोल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत केला.महिलांवरील अत्याचार ही शरमेची बाब आहेच. ते रोखण्यासाठी आम्ही कठोर कायदा आणतोय, पण उत्तर प्रदेशात दंगली होतायेत, दिल्ली जिथे पोलीस केंद्राचे आहेत तिथे शाहीनबाग घडतेय, जेएनयूमध्ये अतिरेकी घुसले. मारहाण केली, पण त्यांना पकडले नाही. भाजपवाल्यांनी स्वत:च्या बुडाखाली जळतंय की बर्फ ठेवलाय तेवढं पाहून घ्यावं, असा टोलाही त्यांनी हाणला.शेतकरी कर्जमाफी, पाच दिवसांचा आठवडा, मुलांना मोफत चष्मे, शिवभोजन योजना या उपलब्धींचा उल्लेख करून ते म्हणाले की, आमचे सरकार स्थिरावले आहे आणि काम करतेय पण ते विरोधकांच्या पचनी पडत नाही. विरोधकांनी चांगल्याला निदान चांगलं म्हणावं, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीचा बोर्ड अंदमानच्या कारागृहात काढला गेला तेव्हा भाजपचे राम कापसे हे तिथे नायब राज्यपाल होते. तेव्हा भाजपने काही हरकत घेतली नव्हती. सावरकरांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहणारा ठराव आणायचे काय ते पाहू पण हिंदुत्व, सावरकर ही काही भाजपची मक्तेदारी नाही, अशी प्रतिक्रिया ठाकरे यांनी एका प्रश्नात सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तूर खरेदीत दिरंगाई होत नसल्याचे सांगितले.गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी अलिकडे हैदराबादला जाऊन दिशा कायद्याची घेतलेली माहिती आणि महिला अत्याचार रोखण्यासाठी राज्यात येणारा कायदा या बाबत पत्रकारांना माहिती दिली. पाच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची समिती नेमली असून ती सरकारला लवकरच अहवाल देईल व पुढील अधिवेशनात त्यासंबंधीचा कायदा केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.आमची नाराजी आहेचभीमा-कोरेगाव प्रकरणी एल्गार परिषदेच्या संदर्भातील चौकशी केंद्र सरकारने एनआयएकडे ज्या पद्धतीने दिली त्याबाबत आमची नाराजी आहेच. राज्याच्या तपास यंत्रणेवर एकप्रकारे अविश्वास दाखविण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.एनपीआर : मंत्र्यांची समिती नेमणार‘सीएए’बाबत मी माझी भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. एनपीआरमध्ये नेमक्या कोणत्या त्रुटी आहेत, हे तपासण्यासाठी जबाबदार मंत्र्यांची समिती नेमणार आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
'विरोधकांना निव्वळ पोटदुखी; स्वत:च्या बुडाखाली बघा'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 4:03 AM