मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वीच विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपमध्ये सामील करून घेत मंत्रीपद देण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविण्यासाठी विखेंची मदत होईल, अशी योजना भाजपची होती. मात्र विखे पाटील महाराष्ट्रातील सोडाच पण, आपल्या नगर जिल्ह्यातील युतीच्या उमेदवारांनाही पराभवापासून वाचवू शकले नाही.
शेवटचे सहा महिने मंत्रीपद मिळवणारे विखे शिर्डीतून विजयी झाले. मंत्रीपद मिळाल्यानंतर विखेंनी जिल्ह्यात विरोधकांना 12-0 अशी मात देऊ अशी घोषणाही केली होती. त्यासाठी रणनितीही आखली होती. मात्र बाळासाहेब थोरात यांनी त्यांची योजना हाणून पाडली. नगर जिल्ह्यातील तब्बल 9 जागांवर युतीचा पराभव झाला.
नगरमधील अकोले मतदार संघातून वैभव पिचड, नेवासेमधून बाळासाहेब मुरकुटे, कोपरगावमधून स्नेहलता कोल्हे, श्रीरामपूरमधून शिवसेनेचे भाऊसाहेब कांबळे, राहुरीतून शिवाजी कर्डिले, पारनेरमधून शिवसेनेचे विजय औटी, अहमदनगर शहरमधून अनिल राठोड, कर्जत जामखेडमधून राम शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. एकूणच या नेत्यांचा पराभव विखेही टाळू शकले नाही, अशी चर्चा नगर जिल्ह्यात आहे. नगर जिल्ह्यावर विखे कुटुंबीयांचे वर्चस्व असल्याचे सांगण्यात येते. मात्र पक्षांतरानंतर हे वर्चस्व काही प्रमाणात कमी झाल्याचे या निवडणुकीत समोर आले आहे.