नागपूर : सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सचे (सिम्स) संचालक तथा प्रख्यात न्युरोलॉजिस्ट डॉ. गिरधर मदनगोपाल ऊर्फ जी.एम. टावरी यांचे गुरुवारी पहाटे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते़ त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा डॉ. प्रणय यांनी मुखाग्नी दिला. त्यांच्या मागे मुलगी प्रीती राठी व मोठा आप्तपरिवार आहे. मध्यभारतातील न्युरोलॉजी चिकित्सकामधील प्रथम प्रवर्तक, उत्कृष्ट चिकित्सक व ज्ञानाचा सागर असा त्यांचा नावलौकिक होता. मध्य प्रदेशातील सौंसर तालुक्यातील पारडसिंगा या छोट्याशा गावात १ जून १९३२ रोजी टावरी यांचा जन्म झाला. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयातून १९५७ मध्ये वैद्यकीय अभ्यासक्र म पूर्ण केल्यानंतर १९६० मध्ये त्यांनी मेडिसीनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. मेंदूच्या कार्यातील गुंतागुंत आणि त्यामुळे उद्भवणारे विविध आजार हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. या ओढीतूनच त्यांनी तामिळनाडूमधील वेल्लोरच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेज येथून न्युरोलॉजीमधून पदव्युत्तर शिक्षण घेतले. १९६२ ते १९७३ पर्यंत या कॉलेजमध्ये त्यांनी सेवा दिली. नागपूरमध्ये त्यांनी गोपीकृष्ण टावरी चॅरिटेबल ट्रस्टअंतर्गत १९८२ मध्ये बजाजनगर येथे सिम्स हॉस्पिटल सुरू केले. हे रुग्णालय म्हणजे गरिबांच्या मेंदूला जडणाऱ्या आजारांवर माफक दरांत उपचार करणारा एकमेव आधार बनले आहे. (प्रतिनिधी) वैद्यकीय क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तिमत्व पडद्याआड गेले - विजय दर्डा डॉ.जी.एम. टावरी यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तिमत्व पडद्याआड गेले, अशी शोकसंवेदना लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, डॉ. टावरी यांनी नेहमी मानवतेवर भर दिला. आपल्या वैद्यकीय सेवेत त्यांनी कधीही व्यावसायिकपणा येऊ दिला नाही. नागपुरातील सिम्स हॉस्पिटल ही त्यांच्या कार्याची पावती होय. त्यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रासोबतच वैयक्तिक हानी झाली. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. धन्वंतरीला मुकलोडॉ. जी.एम. टावरी यांच्या निधनाने समर्पित भावनेने काम करणाऱ्या ज्येष्ठ धन्वंतरीला आपण मुकलो आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले, सिम्सची स्थापना करून परिणामकारक उपचारांबरोबरच संशोधनाची सोय उपलब्ध करून दिली. रु ग्णसेवेचे आपले व्रत त्यांनी अखेरपर्यंत जपले.
न्युरोलॉजिस्ट गिरधर टावरी यांचे निधन
By admin | Published: June 19, 2015 2:45 AM