मुंबई : अवघ्या २२ दिवसांत स्वाईन फ्लूचे मुंबईत २४० रुग्ण आढळले आहेत. यापैकी १३६ जण बरे झाले आहेत. रविवारी मुंबईत नवे २२ रुग्ण आढळले. यामध्ये ९ लहान मुलांचा समावेश आहे. रविवारी ठाणे येथून एक महिला स्वाइनच्या उपचारासाठी दाखल झाल्याची माहिती साथरोग नियंत्रण कक्षाकडून मिळाली आहे. शनिवारपासून दिवसा मुंबईचे तापमान वाढले आहे. त्यामुळे स्वाईन फ्लूचा जोर अजूनही कमी झालेला नाही. लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती ही प्रौढांच्या तुलनेत कमी असते. यामुळे मुलांना संसर्गजन्य आजारांची लागण लवकर होते. यासाठी पालकांनी पाल्यांची विशेष काळजी घ्यावी असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर देत आहेत. नवीन २२ रुग्णांपैकी फक्त ४ जणांनाच उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. इतर सर्व रुग्णांना बाह्यरुग्ण विभागात उपचार सुरू आहेत. कोणत्याही लहान मुलाला रुग्णालयात दाखल केलेले नाही. तर मुंबई बाहेरून आतापर्यंत ७२ रुग्ण मुंबईत उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यापैकी १२ जणांचा मृत्यू झाल्याचे नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
एका दिवसात स्वाइनचे नवे २२ रुग्ण
By admin | Published: February 23, 2015 5:03 AM