पुणे : राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे राज्यात नवीन ४८ महाविद्यालये सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असून, त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात ७ नवीन महाविद्यालये सुरू होणार आहेत. शासनाकडून उशिरा मान्यता मिळाल्याने आता या महाविद्यालयांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासूनच विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार आहेत.राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या आदेशानुसार विद्यापीठांनी बृहत्आराखडा प्रसिद्ध करून संस्थांकडून महाविद्यालय सुरू करण्याबाबतचे प्रस्ताव मागविले होते. विद्यापीठातर्फे प्राप्त प्रस्तावांची छाननी करून संबंधित प्रस्ताव शासनाकडे सादर केले होते. विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार शासनाने १५ जूनपर्यंत नव्या महाविद्यालयांना मान्यता देणे अपेक्षित होते. परंतु, येत्या ३१ जुलैपर्यंत नवीन महाविद्यालयांची नावे जाहीर केले जातील, असे शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले. मात्र, त्यास पाच दिवसांची मुदतवाढ घेऊन उच्च शिक्षण विभागाने राज्यातील ४८ महाविद्यालयांच्या मान्यतेबाबतचा अध्यादेश नुकताच प्रसिद्ध केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे विविध शैक्षणिक संस्थांनी नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर केले होते. त्यातील प्रस्तावांची छाननी करून विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी संस्थेला प्रत्यक्ष भेट दिली. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यांतील १६ ते १७ महाविद्यालयांचे प्रस्ताव शासनास सादर केले होते. त्यातील केवळ ७ महाविद्यालयांना शासनाकडून मान्यता मिळाली आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील ४, नाशिक जिल्ह्यातील १ आणि अहमदनगर जिल्ह्यातील २ महाविद्यालयांचा समावेश आहे.
नव्या ४८ महाविद्यालयांना राज्यात मिळाली मान्यता
By admin | Published: August 09, 2016 1:54 AM