पुणे : कर्तृत्वाच्या झळाळीने आकाशाला गवसणी घालणाऱ्या महिलांना सलाम करण्यासाठी लोकमत माध्यम समूहाने राष्ट्रीय पातळीवर सुरू केलेल्या उपक्रमाला एइसीसीच्या सहकार्याने आयोजिण्यात आलेल्या ‘लोकमत वुमेन समिट’ या चळवळीचे पाचवे पर्व रविवारी (दि. २२) पुण्यात हॉटेल हयात रिजेन्सी येथे होणार आहे. या राष्ट्रीय परिषदेमध्ये विविध क्षेत्रांत कर्तृत्वाचा ठसा उमटविलेल्या महिलांच्या शौर्याला सलाम करण्यात येणार आहे, तसेच महिला सक्षमीकरणाबाबत विविध विषयांवर विचारमंथनही केले जाणार आहे.या वेळी विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या शबाना आझमी, लेखक चेतन भगत, महिला व बालकल्याणमंत्री व ग्रामीण विकासमंत्री, महाराष्ट्र राज्य पंकजा मुंडे-पालवे, यूएसके फाउंडेशनच्या संस्थापक-अध्यक्षा उषा काकडे उपस्थित राहणार आहेत. महिला सक्षमीकरणाची चळवळ बळकट करतानाच महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि त्यांचा आवाज देशभरातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकमत माध्यम समूहाने ‘लोकमत वुमेन समिट’ हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. संपूर्ण देशांतील विविध क्षेत्रांतील महिलांकडून या चळवळीला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. गेली चार वर्षे सातत्याने विविध राष्ट्रीय पातळीवरील महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या महिला या समिटमध्ये सहभागी झाल्या आहेत. याच यशोगाथेचा पुढचा टप्पा म्हणजे परिषेदचे पाचवे पर्व आयोजिण्यात आले आहे. या परिषदेमध्ये यामध्ये मानबी बंडोपाध्याय (लिंगबदल केलेल्या कोलकाता येथील पहिल्या प्राचार्या), छवी राजावत (एमबीए झालेल्या भारतातील पहिल्या महिला सरपंच), निर्मला कंदलगावकर (अध्यक्षा, विवम अॅग्रोटेक), प्रिया नाईक (संस्थापिका व व्यवस्थापकीय संचालिका, समिता सोशल व्हेंचर) जेसी पॉल (व्यवस्थापकीय संचालिका, पॉल रायटर), शैली चोप्रा (माजी वरिष्ठ संपादिका ईटी नाऊ), रिचा अनिरुद्ध (प्रख्यात निवेदिका), डॉ. ऋची दास (मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालिका हेल्थ कर्सर) तसेच शिरोज या आग्रा येथील संस्थेच्या प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सीएनएन आयबीएन, आयबीएन लोकमत तसेच आयबीएन - ७ हे टेलिव्हिजन पार्टनर आहेत. सहयोगी प्रायोजक एनईसीसी आहे. हाऊसिंग पार्टनर अजमेरा हौसींग कॉर्पोरेशन आहेत. (प्रतिनिधी)
नव्या युगाच्या महिला करणार परिवर्तनावर विचारमंथन
By admin | Published: November 16, 2015 1:53 AM