गजानन मोहोड,
अमरावती- उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस आधी उमेदवाराला नवे बँकेत खाते उघडणे बंधनकारक आहे. खात्यातील रकमेतून २० हजारांपर्यंतचा खर्च रोखीने करण्याची मुभा आहे. त्यापेक्षा अधिक रकमेचा व्यवहार रेखांकित धनादेश, ड्राफ्ट, आरटीजीएस किंवा नेफ्टद्वारेच उमेदवाराला करावा लागणार आहे. आयोगाच्या आदेशान्वये प्रत्येक उमेदवाराला तो लढवित असलेल्या प्रत्येक निवडणुकीकरिता स्वतंत्र बँक खाते उघडून त्या खात्याद्वारेच निवडणूक खर्च करावा लागेल. उमेदवाराला निवडणुकीसाठी मिळणारा सर्व निधी त्याच खात्यात जमा करावा लागेल. तसे न केल्यास उमेदवाराने निवडणूक खर्च विहित पद्धतीने न ठेवल्याचा ठपका आयोगाद्वारा ठेवण्यात येईल. उमेदवाराने विहित नमुन्यात निवडणूक खर्चाचा तपशील निवडणूक निकाल जाहीर झाल्याच्या ३० दिवसांच्या आत सादर न केल्यास उमेदवार अनार्ह ठरू शकेल. उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या दिनांकापासून निकाल जाहीर होण्याच्या तारखेपर्यंतच्या खर्चाचा तपशील उमेदवार किंवा त्याच्या निवडणूक प्रतिनिधींना सादर करावा लागेल. या खर्चात उमेदवारी अर्जासोबतची अमानत रक्कमही समाविष्ट असेल. निवडणुकीसाठी उघडण्यात आलेल्या स्वतंत्र बँक खात्याच्या पुस्तकातील नोंदींची छायांकित प्रत उमेदवाराला स्वत: प्रमाणित करून द्यावी लागणार आहे. (प्रतिनिधी)>सामाईक बँक खात्यालाही परवानगीउमेदवार निवडणूक खर्चाबाबतचे खाते हे स्वत:च्या किंवा निवडणूक प्रतिनिधींच्या वा दोघांच्या नावे (सामाईक) कोणत्याही बँकेत उघडू शकतात. मात्र, पूर्वीचेच बँक खाते वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. उमेदवाराचा नातेवाईक निवडणूक प्रतिनिधी असल्यास त्याला सामाईक बँक खाते उघडता येणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. >दुसऱ्या दिवशी २ वाजेपर्यंत मुभा उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून तर मतमोजणीपर्यंत प्रत्येक उमेदवाराने किती खर्च करावा, यासाठी आयोगाने मर्यादा घालून दिली आहे. उमेदवाराने स्वतंत्र खाते उघडून त्या खात्यामार्फत खर्च करावयचा आहे. दररोजच्या खर्चाचा हिशेब दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देणे बंधनकारक आहे.