पुणे : देश व जगभरात वैद्यकीय क्षेत्रातील बदलाचा वेध घेत आरोग्य विज्ञान विद्यापीठाने होमिओपॅथी विद्या शाखेचा विस्तार करण्यासाठी पावले उचलली आहेत. यात अनेक प्रकारचे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम विद्यापीठाकडून लवकरच आणले जाणार आहेत. त्यासाठी एक खास प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. आपल्या शिक्षणपद्धतीत पुस्तकी ज्ञान आणि त्याचा प्रत्यक्ष होणारा उपयोग यामध्ये मोठी तफावत असते. या पार्श्वभूमीवर हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. ‘सर्टिफिकेट कोर्स इन फार्माकॉलॉजी’ असे होमिओपथीच्या या नव्या अभ्यासक्रमाचे नाव असून तो एक वषार्चा असणार आहे. या अभ्यासक्रमातून होमिओपॅथी व्यावसायिक व रोजगाराभिमुख होणार आहे. तूर्तास हा अभ्यासक्रम राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुरू केला जाणार असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी सांगितले.होमिओपॅथीच्या प्रॅक्टीसचा १० वर्षांचा अनुभव असणारे डॉक्टर हा अभ्यासक्रम करु शकतील. पूर्वी हा अभ्यासक्रम पूर्ण वेळाचा असल्याने प्रॅक्टीस करताना तो करणे काही प्रमाणात अवघड होत होते. मात्र आता या अभ्यासक्रमाचे तास तेवढेच ठेवून तो शनिवार व रविवारी करण्यात आल्याने आपली प्रॅक्टीस संभाळून होमिओपॅथीच्या डॉक्टरांना तो करता येणार आहे. तर दुसरीकडे राज्यातील होमिओपथी वैद्यकीयसाठी हा अभ्यासक्रम आठवड्यातून दोन दिवस सुरू राहील. प्रत्येक दिवशी आठ तास म्हणजे सहा तास तासिका व दोन तास प्रात्यक्षिक असेल. यातील चार तास आपत्कालीन विषयाचे शिक्षण दिले जाणार आहे. (प्रतिनिधी)हा अभ्यासक्रम सुरु व्हायला साधारण एक महिना लागेल. सध्या या अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयाने उपलब्ध कर्मचारी वर्गाचा वापर करावा. ६ महिन्यांनी त्यांना या विशिष्ट अभ्यासक्रमासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती मंजूर केली जाईल. या अभ्यासक्रमात अॅलोपॅथीच्या अभ्यासक्रमातील काही भागाचा समावेश करण्यात आला असल्याने अॅलोपॅथीची प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरांना हा अभ्यासक्रम झालेले होमिओपॅथीचे डॉक्टर असिस्ट करु शकतील. - डॉ. अरुण जामकर, कुलगुरु,महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ
होमिओपॅथीसाठी नवा सर्टिफिकेट कोर्स
By admin | Published: September 18, 2015 12:49 AM