मुंबई : कोट्यवधी भारतीयांच्या जिवाची पर्वा न करता आरोग्यास घातक असलेल्या मॅगीची बिनदिक्कत विक्री केलेल्या नेस्ले कंपनीने आता कायदेशीर पळवाट शोधण्यासाठी जणू नवा कट शिजवल्याचा दाट संशय निर्माण झाला आहे. जनतेचा विश्वास जिंकण्याच्या बाबतीत डाळ न शिजलेल्या मॅगीसाठी रचलेल्या या नव्या क्लृप्तीने कंपनीविषयीच्या उरल्यासुरल्या विश्वासाचेही पानिपत होण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. कोणाकडे मॅगी नुडल्सची न उघडलेली पाकिटे असतील तर ती आम्हाला द्या, तुम्हाला त्याचे पैसे परत देऊ, असे आवाहन करणारी जाहिरात नेस्ले इंडियाने केली आहे. पण यातील मखलाशी अशी, की ही जाहिरात फक्त इंग्रजीत, तीही तुलनेने कमी खपाच्या दैनिकात करण्यात आली आहे. याचाच अर्थ असा, की आम्हाला ग्राहकांचे नुकसान होऊ द्यायचे नाही असा आव तर आणायचा; पण प्रत्यक्षात ही तथाकथित आॅफर बहुसंख्य ग्राहकांपर्यंत पोहोचणार नाही याची काळजीही घ्यायची. याचा दुसरा पैलू असा, की सर्वस्वी भारतीय भाषांचा वापर करणाऱ्या व याच भाषांमध्ये लोकव्यवहार करणाऱ्या कोट्यवधी ग्राहकांना नेस्लेने या आॅफरपासून वंचित ठेवले आहे. कंपनीच्या चतुराईचा भाग असा की, म्हटले तर ग्राहकांना पैशाचा परतावा देऊ करण्याचा इरादा कागदोपत्री नोंदविला जाईल पण प्रत्यक्षात ग्राहकांना लाभ मिळणार नाही. म्हणूनच ही केवळ एक चलाख कायदेशीर पळवाट असल्याचा दाट संशय निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)
विश्वासाचे पानिपत तरी मॅगीचा नवा कट
By admin | Published: June 24, 2015 4:31 AM