मुंबई/भोपाळ: देशातील कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आहे. मात्र महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. दोन्ही राज्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंट (AY.4.2) आढळून आला आहे.
मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये नव्या व्हेरिएंटचे ७ रुग्ण आढळून आल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. नॅशनल सेंटर ऑफ डिजीज कंट्रोलच्या जिनॉम सिक्वन्सिंग अहवालातून ही माहिती समोर आली आहे. नव्या व्हेरिएंटची लागण झालेल्या सात जणांपैकी दोन जण लष्कराचे अधिकारी असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. सैत्या यांनी दिली. यासोबतच महाराष्ट्रातील एक टक्का नमुन्यांमध्ये हा व्हेरिएंट आढळून आला आहे.
डेल्टा AY.4.2. म्युटेशनवर संशोधन सुरू असल्याची माहिती ब्रिटनच्या आरोग्य सुरक्षा यंत्रणेनं २० ऑक्टोबरला दिली आहे. या व्हेरिएंटच्या प्रसाराचा वेग अधिक आहे. त्यामुळे त्याला VUI-21OCT-01 असं शास्त्रीय नाव देण्यात आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून या व्हेरिएंटनं ब्रिटनमध्ये धुमाकूळ घातला आहे. डेल्टाच्या तुलनेत या व्हेरिएंटच्या प्रादुर्भावाचा वेग जास्त आहे.