ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. १३ - अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात देवीच्या दर्शनासाठी जाताना तुम्ही चुडीदार ड्रेस घालून आल्यास श्रीपूजक प्रवेश करू देणार नाहीत, कारण देवीची तशी परंपरा आहे म्हणून तुम्ही साडी नेसून देवीच्या दर्शनाला जावे, अशी सूचना येथील जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख यांनी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना केली. मात्र त्यांनी त्यास नकार दिला असून आपण चुडीदार घालूनच मंदिरात जाणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मंदिर प्रवेशाचा गुंता सुटल्यावर आता ड्रेसकोडवरून नवा वाद सुरू झाला आहे.
दरम्यान, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई शहरातून विजयी रॅली काढून महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्य़ावर ठाम आहेत. तर हिंदूत्ववादी संघटनांनी याला प्रचंड विरोध केला आहे. त्यामुळे ब्रिगेड आणि हिंदुत्ववादी संघटनांमध्ये संघर्ष निर्माण झाला असून शहरात प्रचंड तणाव झाला आहे.
भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी कोल्हापुरातून विजयी रॅली काढण्यास सुरवात केली आहे. तर त्यांना गाभाऱ्यात प्रवेश करण्यावर हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला. गाभाऱ्यात प्रवेश करतांना साडी परिधान करुनच येण्याची अट मंदिर प्रशासनाने घातली आहे. तर देवीच्या दरबारात येताना रॅली कशासाठी असा प्रश्न उपस्थित करत भुमाता ब्रिगेडच्या रॅलीविरोधात प्रतीरॅली काढणार असल्याचे हिंदुत्ववादी संघटनांनी जाहीर केले आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला. तसेच महालक्ष्मी मंदीर आणि परिसरातील सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत आणि पोलिस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे.