ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 12 - दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवलेली रिलायन्स जिओ कंपनी ग्राहकांसाठी धमाकेदार 4जी फोन बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. रिलायन्स जिओ 4G VoLTEला सपोर्ट करणारा फोन लवकरच लाँच करणार आहे. विशेष म्हणजे या 4जी फोनची किंमत इतर स्मार्टफोनपेक्षा फारच कमी आहे. गॅझेट्स वेबसाइट 91 मोबाइल डॉट कॉमनुसार, या रिलायन्स जिओ 4G VoLTE फोनची किंमत 1734 रुपये ते 1800 रुपयांपर्यंत असणार आहे. रिलायन्स जिओचा भारतातील गरिबातील गरीब ग्राहकापर्यंत सेवा पोहोचवण्याचा मानस आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रिलायन्स 4G VoLTE या मोबाईलचे दोन व्हेरिएंट्स लाँच करणार आहे. रिलायन्स जिओ या मोबाईलमध्ये Qualcomm आणि Spreadtrum प्रोसेसरचा वापर करणार आहे. Qualcomm प्रोसेसरच्या मोबाईलची किंमत 1734 रुपयांपर्यंत असणार आहे. Spreadtrum मोबाईलची किंमत 1800 रुपये असेल. रिपोर्टनुसार या मोबाईलचं प्रोडक्शनही सुरू करण्यात आलं आहे. रिलायन्स जिओ केवळ 1500 रुपयांच्या बाजारमूल्यात हा मोबाईल लाँच करणार असल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत होती. मार्केट एक्सपर्ट्सनुसार, रिलायन्स जिओ सुरुवातीला सबसिडीच्या माध्यमातून या मोबाईलची विक्री करणार आहे. ग्राहकांची संख्या जास्तीत जास्त वाढवण्यासाठी रिलायन्स जिओ ही शक्कल लढवणार आहे. आतापर्यंत रिलायन्स जिओचे 10 कोटी युझर्स झाले आहेत. जिओच्या या नव्या 4G VoLTE स्मार्टफोनची स्क्रीन 2.4 इंच आहे. तसेच या मोबाईलमध्ये 512 एमबी रॅम देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4 जीबी इंटर्नल मेमरी असेल. 4G VoLTE स्मार्टफोनला मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट करणार आहे. तसेच 2 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि व्हिजीए फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या माध्यमातून तुम्ही वायफायही कनेक्ट करू शकता. तसेच 4G VoLTE या स्मार्टफोनमध्ये जीपीएस प्रणालीही बसवण्यात आली आहे. रिलायन्स जिओचं 5 कोटी हँडसेट बाजारात विकण्याचं लक्ष्य आहे. त्यामुळे लवकरच ग्राहकांना जिओचा स्वस्तातला मोबाईल मिळणार आहे.
जिओचा नवा धमाका, 1734 रुपयांत येणार जिओचा 4जी स्मार्टफोन
By admin | Published: June 12, 2017 5:24 PM