चाकण : गाडामालक व बैलगाडा शौकिनांची वाढती संख्या लक्षात घेऊन यंदा चाकण येथे तीन लाख रुपये खर्च करून नवीन घाट तयार करण्यात आला असून, या नवीन घाटाचे संपूर्ण काम कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. संचालक गुलाबराव गोरे-पाटील व उद्योगपती किसनराव गोरे आणि चंद्रकांत गोरे-पाटील यांनी स्वखर्चातून केले आहे. त्यामुळे बौद्ध पौर्णिमेला भैरवनाथमहाराजांची होणारी यात्रा नवीन घाटाच्या रूपाने चांगलीच गाजाणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. ग्रामीण भागातील गाडामालकांसह गाडा शौकिनांना गाड्यांच्या रूपाने घाटाचा मनसोक्त आनंद लुटता यावा यासाठी गोरे-पाटील परिवाराने पुढाकार घेऊन तब्बल तीन लाख रुपये खर्च करून आकर्षक असा नवीन घाट तयार करून घेतला आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रगतिशील शेतकरी सखाराम गोरे, ज्ञानेश्वर गोरे, शंकर गोरे व सुदाम गोरे या चार भावंडांनी या नवीन घाटासाठी जागा दिली आहे. चाकण येथील रोहकल रस्त्यावर शेळी-मेंढी बाजार अर्थात खडीमशिनजवळ हा नवीन घाट तयार करण्यात आला आहे. घाटातून पळणारा गाडा इतरत्र वळू नये यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्याचे भैरवनाथ उत्सव कमिटीचे अध्यक्ष व पोलीस पाटील वसंतराव गोरे व युवा नेते बाळासाहेब गायकवाड यांनी आवर्जून सांगितले. घाटाच्या दुतर्फा गाडाशौकिनांना मनमोकळेपणाने गाडे पाहण्यासाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. (वार्ताहर)
चाकणच्या शर्यतीसाठी यंदा नवा घाट!
By admin | Published: May 07, 2014 3:47 PM