सोलापूर : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतरही राज्याच्या महाअधिवक्तापदी ज्येष्ठ वकील आशुतोष अरविंद कुंभकोणी यांची नियुक्ती कायम करण्यात आली आहे. यासंदर्भात ७ डिसेंबर रोजी काढण्यात आलेल्या अधिसूचनेवर मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सही केली आहे. ज्येष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी यांची भाजप - सेना युती सरकारने ७ जून २०१७ रोजी राज्याच्या महाअधिवक्तापदी नियुक्ती केली. या पदावर अॅड. कुंभकोणी यांना कायम करण्यात येत आहे, अशी अधिसूचना ७ डिसेंबर रोजी राज्य सरकारने काढली व त्यावर मेहता यांची सही आहे.
माजी महाअधिवक्ता रोहित देव यांची उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून २०१७ मध्ये नियुक्ती झाल्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अॅड. कुंभकोणी यांची त्यांच्या जागेवर नियुक्ती केली. १२ जुलै १९५६ रोजी कुंभकोणी यांचा जन्म झाला. त्यांचे संपूर्ण कुटुंबच वकिली व्यवसायात आहे.
२००५ पासून अॅड. कुंभकोणी यांनी तीन वर्षांपेक्षा अधिक काळ राज्याचे सहायक महाअधिवक्ता म्हणून कामकाज सांभाळले आहे. त्यांनी राज्य सरकारच्या पॅनेलसाठीही काही वर्षे काम केले.
१ एप्रिल २००५ पासून तीन वर्षे ते राज्याचे असोसिएट अॅडव्होकेट जनरल होते आणि अनेक कायद्यांचा मसुदा तयार करण्यात त्यांनी हातभार लावला. मुंबई विद्यापीठासह अनेक विद्यापीठे, राज्यातील महापालिका व अन्य अनेक महत्त्वाच्या संस्थांची बाजू त्यांनी अनेक प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयात मांडली आहे. उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाल्यावर काही काळाने त्यांनी राजीनामा दिला होता. ते काही वर्षे सहमहाअधिवक्ताही होते.
सोलापुरात केली १० वर्षे सेवा- अॅड. आशुतोष कुंभकोणी यांना ३५ वर्षांच्या वकिलीचा अनुभव आहे. त्यापैकी दहा वर्षे त्यांनी सोलापुरात वकिली केली. बी.एस्सी.नंतर त्यांनी वकिलीची पदवी घेतली. १९८२ मध्ये सनद घेतली. १९९२ मध्ये ते मुंबईस गेले. त्यांनी अनेक महत्त्वाच्या खटल्यांत काम केले असून, न्यायालयाने ‘अॅमिकस क्युरी’ म्हणूनही त्यांची मदत घेतली आहे. त्यात शेतक ºयांच्या आत्महत्या, न्यायालयांमध्ये मूलभूत सुविधांची वानवा, पाण्याचे समान वाटप, डॉक्टरांचा संप आदी प्रकरणांत त्यांनी न्यायालयाला मोलाचे सहकार्य केले.
महाअधिवक्ता म्हणजे काय ?- राज्य सरकार आणि राज्यपाल यांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी भारतीय कलम १६५ नुसार महाअधिवक्त्याचे पद निर्माण केले आहे. हा महाअधिवक्ता राज्य सरकारचा वकील म्हणून देखील काम करतात. महाअधिवक्त्याला अनेक वैधानिक स्वरुपाची कार्य पार पाडवी लागतात. त्यामुळे या पदावरील व्यक्ती राज्याचा प्रथम कायदा अधिकारी म्हणून ओळखला जातो. राज्यपाल महाअधिवक्त्याची नेमणूक करतात.