- खलिल गिरकर मुंबई : मद्यसेवन करून वाहने चालविल्याने मोठ्या प्रमाणात अपघात घडतात व त्यामध्ये अनेकांचा मृत्यू होतो. असे प्रकार रोखण्यासाठी ‘सुरक्षित राहा, मद्यसेवन करून वाहने चालवू नका’ असा सुधारित वैधानिक इशारा छापण्याचा निर्णय राज्य शासन व राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे घेण्यात आला आहे.मद्यसेवन करून वाहन चालविण्यास संपूर्ण भारतात बंदी आहे. तो गुन्हाच आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांचे लायसन्स अनेकदा रद्द करण्यात येते आणि जबर दंडही आकारण्यात येतो. तरीही लहान-मोठ्या शहरांपासून खेडगावांपर्यंत सर्वत्र दारू पिऊ न लोक वाहने चालवितात, असे आढळून आले आहे. त्यांना पोलिसांनी अडवल्यास त्यांच्याकडून दंडवसुली होईल आणि प्रसंगी लायसन्सही रद्द होईल, पण मद्यपींचे लोकशिक्षक करण्याच्या दृष्टीने मद्यांच्या बाटल्यांवर हा इशारा छापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन राजपत्रात १९ सप्टेंबर रोजी याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढील मद्याच्या सर्व बाटल्यांच्या वेष्टनावर हा वैधानिक इशारा छापण्यात येईल. आतापर्यंत मद्याच्या बाटलीवर ‘मद्यसेवन हे आरोग्यास हानिकारक आहे’ इतकाच वैधानिक इशारा छापण्यात येत होता. मात्र, वाढत्या अपघातांमुळे या इशाºयामध्ये आणखी इशारा जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.नव्याने बाजारात येणाºया सर्व प्रकारची मद्ये, तसेच वाइन्सच्या बाटल्यांवर, तसेच त्यांच्या बॉक्सेसवर हा इशारा छापण्यात येणार आहे. त्यामुळे मद्य पिणाऱ्यांनाच नव्हे, तर घरच्यांनाही ही गंभीर बाब असल्याचे अधिक तीव्रतेने जाणवेल, असे सरकारला वाटत आहे.महिन्याभरात निर्णयाची अंमलबजावणीदेशी दारू, भारतीय बनावटीचे विदेशी मद्य, वाइन, बीअर अशा सर्व प्रकारच्या मद्यावर हा वैधानिक इशारा छापण्यात येणार आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेला मद्यसाठा व उत्पादित करण्यात आलेला मद्यासाठा वगळून पुढील महिन्याभरात या निर्णयाची अंमलबजावणी झालेल्या बाटल्या बाजारात येतील, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागातील अति वरिष्ठ अधिकाºयांनी ‘लोकमत’ला दिली.
मद्याच्या बाटल्यांवर छापणार नवा इशारा; सरकारचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 4:12 AM