मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी येत्या महिन्याभरात तातडीने नवीन वसतिगृहे सुरु करण्यात येतील, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी बुधवारी येथे दिली. सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांची क्षमता कमी आहे. त्यामुळे ‘समता व न्याय वर्षा’त राज्यात ५० वसतिगृहे बांधण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची जास्त मागणी आहे अशा पुणे, मुंबई, नवी मुंबई, औरंगाबाद, नाशिक, लातूर, अमरावती, नागपूर, भंडारा, गडचिरोली आदी जिल्ह्यांत तातडीने वसतिगृहे सुरू करावीत. ज्या ठिकाणी जागा उपलब्ध नसेल तेथे जागा भाडेतत्त्वावर घेऊन तातडीने सोयी उपलब्ध करून द्याव्यात. यासाठीचे मनुष्यबळ कंत्राटी तत्वावर घेण्यात यावेत, अशा सूचना बडोले यांनी एका बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या. मागसवर्गीय समाजातील नोकरी करणाऱ्या महिलांसाठी पुणे, नागपूर, मुंबई या शहरांसह ठाणे, नाशिक, नवी मुंबई येथेही ‘वर्किंग वुमेन्स हॉस्टेल’ सुरू करण्यात येणार आहेत. या वसतिगृहासाठी जागा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शिष्यवृत्ती दिवाळीपूर्वी द्या सामाजिक न्याय विभागामार्फत मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती व फ्रीशिपची रक्कम दिवाळीपूर्वी देण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दिले. आॅनलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये समस्या आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.