वसंत भोईर , वाडाआदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या निवासस्थानासमोर सोमवारी सुरू केलेले ठिय्या आंदोलन मंगळवारी पहाटे ५ वाजता मागे घेण्यात आले. २० हजार विद्यार्थी क्षमतेची वसतिगृहे उभारण्याची व त्यातील विद्यार्थ्यांकरिता असलेली डबा पद्धत बंद करून चांगल्या दर्जाचे भोजन देण्याची प्रमुख मागणी नाशिक विभागाचे आदिवासी विकास आयुक्त राजीव जाधव यांनी मान्य केली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सहाही जिल्ह्यांतील प्रकल्प अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक पुण्यात घेण्यात येईल, असा निर्णय या वेळी झाला. वनाधिकार योजनेची तातडीने अंमलबजावणी करून वंचित घटकांना लाभ देण्याचे मान्य करण्यात आले. ज्या मागण्या शासन स्तरावर आहेत त्यांच्यासाठी संबंधित मंत्र्यांसोबत येत्या आठवड्यात बैठक घेऊन हे प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन आयुक्त जाधव यांनी शिष्टमंडळाला दिले.आदिवासींच्या वनजमिनीसंदर्भातील वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करा, बोगस आदिवासींवर कठोर कारवाई करा, वनजमिनी कसणाऱ्यांना हुसकावून लावण्याचे कारस्थान थांबवा, पेसा कायद्याची अंमलबजावणी करा, रोहयोची कामे तातडीने सुरू करा, भाताला हमीभाव द्या, आदिवासी बेघरांना घरकुले द्या, आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक व आश्रमशाळांची दुरवस्था दूर करा, वसतिगृहांच्या समस्या सोडवा या मागण्यांसाठी किसान सभेने सोमवारी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरांच्या वाड्यातील निवासस्थानासमोर ठिय्या दिला होता. आदिवासी विकास विभागाच्या अनेक अधिकाऱ्यांनी मागण्यांसंदर्भात दिवसभर चर्चा करण्याचा प्रयत्न केला; मात्र आंदोलकांनी या दुय्यम अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यास नकार दिल्याने आंदोलनाची तीव्रता अधिक वाढली. प्रशासनाने गंभीर दखल घेत नाशिक येथील आदिवासी विकास विभागाचे आयुक्त राजीव जाधव यांनी तातडीने रात्रीच आंदोलनस्थळ गाठले. विविध मागण्यांसंदर्भात त्यांनी माकपचे राज्य सेक्रेटरी कॉ. अशोक ढवळे, किसान सभेचे सेक्रे टरी अजित नवले, स्टुडंट्स फेडरेशनचे दत्ता चव्हाण, डी.वाय.एफ.आय.चे वनशा दुमडा यांच्या शिष्टमंडळासोबत शासकीय विश्रामगृहात रात्री ११ वाजेपासून सलग चार तास चर्चा करून मागण्या मान्य केल्याने पहाटे हे आंदोलन मागे घेण्यात आले.
आदिवासींसाठी नवी वसतिगृहे उभारणार
By admin | Published: October 05, 2016 5:20 AM