ड्रग्जने पोखरले गेलेले देशातील राज्य कुठले? तर उत्तर येते ते म्हणजे पंजाब. मुंबईची सर्वसाधारण ओळखही ‘देशाची आर्थिक राजधानी’ अशीच आहे. पण, मुंबई आता पंजाबच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याचे दिसून येत आहे. मुंबईदेखील ड्रग्जची राजधानी बनू पाहत आहे. मुंबईतील अंडरवर्ल्डचे कंबरडे पोलिसांनी मोडले. पण, सध्या ड्रग्जमाफियांचे रॅकेट पाहता अंडरवर्ल्डपेक्षाही भयावह स्थिती मुंबईत बनल्याचे दिसून येत आहे. मुंबईत ड्रग्जसाठी नामचीन मानल्या जाणाऱ्या गोवंडी आणि रे रोड या परिसरात ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन केले. यातून समोर आलेल्या वास्तवावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवनियुक्त पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी गांभीर्याने लक्ष न घातल्यास अख्खी मुंबई पोखरून निघण्याची शक्यता आहे.गेल्या काही काळात म्याँव म्याँव अर्थात एमडी हे जीवघेणे ड्रग्ज सहज उपलब्ध होत होते. मुंबई पोलिसांनी त्याविरुद्ध कारवाई तीव्र करत काही प्रमाणात आळा जरूर घातला. पण त्यानंतर ही कारवाई कुठेतरी थंडावल्याचे चित्र आहे. कारवाई केल्यानंतर पोलिसांच्या ‘हफ्त्यां’ची रक्कम वाढवून आधीपेक्षा अधिक वेगाने हे धंदे फोफावत असल्याचे दिसून येत आहे. ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्येदेखील गोवंडी हे ड्रग्जचे हब बनल्याचेच दिसून आले. गोवंडीत सध्याच्या घडीला शंभरहून अधिक पॅडलर्स ड्रग्जच्या धंद्यात सक्रिय असल्याची माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली आहे. ड्रग्जचा धंदा तेजीत असल्याने करोडोंची उलाढाल होऊन गुन्हेगारी कारवायादेखील वाढत आहेत. विशेष म्हणजे शहरातील गुन्हेगारीला आवर घालण्यासाठी अमलीपदार्थांची तस्करी पूर्णपणे बंद झालीच पाहिजे, असे आदेश मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी दीड वर्षापूर्वी संबंधित यंत्रणांना दिले होते. त्यानंतर काही दिवस पोलिसांनी शहरामध्ये छापेमारी करत मोठ्या प्रमाणात हे धंदे उधळून लावले. मात्र सध्या पोलिसांच्याच आशीर्वादाने अमलीपदार्थांची तस्करी बहरलेली आहे. स्थानिक पोलिसांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना मोठ्या प्रमाणात हप्ता जात असल्याने गोवंडीत हे धंदे वाढतच आहेत. सध्या या व्यवसायात अल्पवयीन मुलांचादेखील मोठ्या प्रमाणात शिताफीने वापर केला जात असल्याचे ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमधून स्पष्ट झाले आहे.1नवी मुंबई, बोरीवली आणि ठाण्याच्या काही परिसरातून हे ड्रग्ज गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात आणले जाते. त्यानंतर या ठिकाणी असलेले मोठे तस्कर हा माल विकत घेऊन अन्य छोट्या विक्रेत्यांना विकतात. पाच ते सहा पट नफा या धंद्यात असल्याने दिवसेंदिवस ड्रग्जच्या पॅडलर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 2उच्चभ्रू वस्तीतील तरुण याकडे आकर्षित होत आहेत. ड्रग्जच्या आहारी गेलेले अनेक धनाढ्य ग्राहक मोठमोठ्या वाहनांमधून शिवाजीनगर परिसरात ड्रग्ज खरेदीसाठी येतात.3गोवंडीतील काही परिसरात तर भररस्त्यात ड्रग्जची विक्री केली असल्याचे ‘लोकमत’च्या स्टिंगमधून समोर आले आहे. या परिसरातील अनेक तरुण आणि विशेष म्हणजे लहान मुलेदेखील या विळख्यात गुरफटली आहेत.
मुंबईची नवी ओळख ड्रग्जची राजधानी
By admin | Published: February 06, 2016 3:55 AM