पुणे : भाषा सल्लागार समितीने तयार केलेल्या मराठी भाषाविषयक धोरणाचा मसुदा शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या धोरणाला मंजुरी देण्यापूर्वी मंत्रालयातील सर्व विभाग, उपविभाग, क्षेत्रीय कार्यालये तसेच साहित्यिक, मराठीविषयक काम करणाऱ्या संस्था, मंडळे, महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांचे मराठी भाषाप्रमुख, नागरिकांकडून धोरणाविषयी सूचना, सुधारणा, हरकती मागवल्या आहेत. यासंदर्भातील अभिप्राय १५ डिसेंबरपर्यंत मराठी भाषा विभाग, नवीन प्रशासन भवन, आठवा मजला, मंत्रालय, मुंबई ४०००३२ किंवा www.marathibhasha.dhoran@gmail.com ई - पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे. पुढील पंचवीस वर्षांचे भाषाविषयक धोरण ठरविताना विविध भागांतील अभ्यासकांशी चर्चा करावी व अभ्यासक - नागरिकांची मते जाणून घ्यावीत, असे निर्देश राज्य शासनाने समितीला दिले होते. त्यानुसार राज्याच्या विविध भागांतील ३५० पेक्षा अधिक मंडळींनी आपली मते समितीपुढे मांडली. या विचारमंथनातून भाषाविषयक धोरणाचा मसुदा तयार करून तो मंजुरीस शासनाकडे पाठवला. मात्र शासनाने या मसुद्यामधील तरतुदींवर पुन्हा अभिप्राय मागविले असून, हा मसुदा संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे.
राज्याचे नवे भाषाविषयक धोरण संकेतस्थळावर
By admin | Published: December 02, 2014 4:25 AM