मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांना नव्या वर्षात नव्या लोकलचा दिलासा मिळणार आहे. तीन नव्या सिमेन्स लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. यातील पहिली लोकल जानेवारी महिन्यात दाखल होईल आणि अन्य दोन लोकल मार्च महिन्यापर्यंत येतील. पाच वर्षांनंतर मध्य रेल्वेच्या ताफ्यात नव्या लोकल दाखल होत आहेत. एमयूटीपी-२ अंतर्गत ७२ बम्बार्डियर लोकल पश्चिम रेल्वेवर टप्प्याटप्प्यात दाखल होत आहेत. याआधी काही बम्बार्डियर लोकल मध्य रेल्वेच्याही वाट्याला होत्या, परंतु तांत्रिक कारणास्तव सर्व लोकल पश्चिम रेल्वेवर चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि पश्चिम रेल्वेवरील धावत असलेल्या सिमेन्स लोकल मध्य रेल्वेकडे वळत्या करण्यात आल्या. मात्र आता पाच वर्षांनंतर थोडाफार दिलासा या मार्गावरील प्रवाशांना मिळणार आहे. एमयूटीपी-१ अंतर्गत नव्या सिमेन्स लोकल मध्य व पश्चिम रेल्वेला मिळत होत्या. २0११ सालापर्यंत मध्य रेल्वेवर लोकल आल्यानंतर यातील तीन लोकल येणे बाकी होत्या. चेन्नईतील रेल्वेच्या कारखान्यातून या लोकलची बांधणी करून त्या दाखल होणे अपेक्षित होते. मात्र त्याआधी बम्बार्डियर कंपनीच्या लोकल बांधून त्या पश्चिम रेल्वेवर दाखल करण्यात आल्या. आता तीन सिमेन्स लोकलही दाखल केल्या जातील, अशी माहिती देण्यात आली. तीन नव्या लोकल दाखल होणार असल्याने मध्य रेल्वेवरील लोकलची संख्या १२२ वरून १२५ होईल. यामध्ये ७0 सिमेन्स बनावटीच्या बारा डब्यांच्या लोकल असून पाच बीएचईएल व काही रेट्रोफिटेड लोकल आहेत. नव्या वर्षात उपनगरीय रेल्वे ‘कॅशलेस’नोटकल्लोळानंतर केंद्राकडून कॅशलेस व्यवहाराचा पर्याय निवडण्यात आला. डेबिट, क्रेडिट कार्डव्दारे रेल्वेतील मेल-एक्सप्रेसचे तिकीट आरक्षणासाठी तिकीट खिडक्यांवर पीओएस मशिन बसवण्यात आले. या सेवेनंतर आता मध्य व पश्चिम रेल्वेवरील लोकलचे तिकीट उपलब्ध करणाऱ्या खिडक्यांवरही पीओएस मशिन बसवण्यात येत आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या कामाला वेग आला असून नविन वर्षात ही सेवा सर्व स्थानकांवर उपलब्ध असेल. मात्र पीओएस मशिनची सेवा ही सुरुवातीला पास काढण्यासाठीच असल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. मध्य रेल्वेवरील ६२४ तर पश्चिम रेल्वेवरील ३२४ तिकीट खिडक्यांवर मशिन बसवण्यात येत आहेत.
नव्या वर्षात मध्य रेल्वेवर नवी लोकल
By admin | Published: December 27, 2016 1:13 AM