- महेश पवारलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे. परंतु, सामान्य प्रशासन विभागाकडे कायमस्वरूपी ३० शिपाई कार्यरत आहेत. १९९८ पासून विभागाने शिपाईपदाची भरती केली नाही. त्यामुळे नवीन मंत्र्यांना शिपाई, चोपदार यांची कमतरता भासेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सामान्य प्रशासन विभागाकडून मुख्यमंत्री आणि मंत्री यांच्यासाठी शिपाई, चोपदार यांची नेमणूक करण्यात येते. १९९८ पर्यंत विभागाकडे शिपाई, नाईक, चोपदार पदांवर १२० जण होते. शिपाई पदावरील व्यक्तींना सेवाज्येष्ठतेनुसार नाईक, चोपदार, अशी पदोन्नती देण्यात येत होती. १९९८ मध्ये सामान्य प्रशासन विभागाने भरती बंद करण्याचा निर्णय घेत नाईकपद रद्द केले. १२० पैकी काही जण वयोमानानुसार निवृत्त झाल्यामुळे आता शिपाई पदावरील केवळ ३० कर्मचारी विभागाकडे आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या दिमतीला २ जमादार, १ चोपदार तर उपमुख्यमंत्र्यांना १ जमादार, १ चोपदार तर, प्रत्येक मंत्र्यांना १ चोपदार १ शिपाई विभागाकडून देण्यात येतात. पदभरती न झाल्यामुळे शिपायांची संख्या कमी झाली आहे. तर, नाईक पद रद्द केल्यामुळे पदोन्नती मिळू न शकल्याने चोपदारही कमी झाले आहेत. परिणामी, महायुती सरकारमधील ३० मंत्र्यांपैकी ६ ते ७ मंत्र्यांकडे शिपाई आणि चोपदार नव्हते, याकडे सूत्रांनी लक्ष वेधले.
चोपदार अनुत्सुकअधिवेशन काळात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सत्ताधारी पक्षाला ८ तर विरोधी पक्षाला ८ अशा एकूण १६ शिपायांची नियुक्ती सामान्य प्रशासन विभागाकडून करण्यात येते. पांढरे कपडे, पांढरी टोपी असा पेहराव करून त्यांना सभागृहाचे नियम काटेकोरपणे पाळावे लागतात. दुसरीकडे मंत्र्यांच्या खासगी पीएकडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे चोपदार मंत्र्याकडे काम करण्यास उत्सुक नसतात, असे त्यांनी सांगितले.
प्रशासनाचे भरतीकडे दुर्लक्ष सामान्य प्रशासन विभागाने कंत्राटी पद्धतीने ४० शिपाई पदे भरली आहेत. परंतु, त्यांना इतर कामांचे वाटप करण्यात आले आहे. शिपाई पदाच्या भरतीची मागणी सातत्याने करण्यात येत असून, सामान्य प्रशासन विभाग त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे नवीन मंत्री आले तरी त्यांना शिपाई आणि चोपदार यांची उणीव भासेल, असे ते म्हणाले.