मुंबई : मुंबईत सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाला आता आणखी एक मुहूर्त मिळाला आहे. पुढील वर्षी म्हणजेच २०१६च्या सप्टेंबर अखेरपर्यंत मुंबईभर ६ हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण होईल, अशी माहिती गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. २००८ साली मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, चारवेळा निविदा मागवूनही सदर काम पुढे सरकू शकले नव्हते. मात्र वर्षभरापूर्वी सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम मार्गी लावण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना केली. तर ९४९ कोटींच्या या कामासाठी लार्सन अँड टुब्रो या कंपनीबरोबर करारही करण्यात आला. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी मुंबईची दोन भागांत विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात दक्षिण मुंबईत १४०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. मुंबई पोलीस आणि एमसीजीएमच्या अधिकाऱ्यांनी या कामासाठी आवश्यक सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले आहे. सदर कॅमेरे बसविण्यासाठी ४३७ ठिकाणी ५५६ पोल उभारावे लागणार आहेत. या वर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण हाईल, असा विश्वास गृह विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्यासाठी अनेक ठिकाणी खोदकाम व पोल उभारावे लागणार आहेत. एमसीजीएमने यातील बहुतांश कामाची परवानगी दिली असून, गृह विभागाने त्यासाठी आवश्यक निधीही एमसीजीएमकडे जमा केला आहे. पावसाळ्यानंतर उर्वरित ठिकाणांवर कॅमेरे बसविण्याची परवानगी मिळविण्यात येईल. हे कॅमेरे उच्च दर्जाचे असणार असून, सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील भागात ७ ते २१ दिवसांपर्यंतचे चित्रीकरण स्टोर करण्याची क्षमता असणारे कॅमेरे बसविले जाणार आहेत. (प्रतिनिधी)
मुंबईतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना नवा मुहूर्त
By admin | Published: May 16, 2015 3:29 AM