नवी दिल्ली: राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण (एनसीईआरटी) समितीने अखेर आपल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्याविषयीच्या मजकुरात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. यापूर्वीच्या पुस्तकात असणाऱ्या 'अवर पास्ट-2' या विभागात छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्याबद्दल अत्यंत त्रोटक माहिती होती. त्यामुळे शिवसेना आणि हिंदू जनजागृती समितीने पाठ्यपुस्तकात बदल करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. सातवी इयत्तेच्या या इतिहासाच्या पुस्तकातील १५४ पृष्ठांपैकी बहुतांश पृष्ठे हिंदुस्थानावर आक्रमण करणाऱ्या मोगल राजांच्या माहितीसाठी खर्ची घालण्यात आली आहेत, तर छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६ ओळींत मांडून संपवण्यात आला, असे शिवसेनेचे म्हणणे होते. याशिवाय, पुस्तकात जागा असूनही शिवरायांचे चित्र छापले नाही. याउलट बाबर आणि त्याच्या उत्तराधिकाऱ्यांची छायाचित्रे मात्र पुस्तकात छापण्यात आली होती. यावर शिवसेना आणि हिंदू जनजागृती समितीने तीव्र आक्षेप घेतला होता. ‘एनसीईआरटी’च्या अभ्यासक्रमात २५ टक्के बदल करण्याचा अधिकार राज्य सरकारला असतो. गोव्यात आंदोलन केल्यानंतर तत्कालीन काँग्रेस सरकारने पूर्ण पाठ्यपुस्तकच बदलले होते. मात्र, केंद्र आणि राज्य शासनाकडे गेली ८ वर्षे पाठपुरावा करूनही, छत्रपतींच्या जन्म आणि कर्मभूमीतच त्यांची उपेक्षा होत आहे, असे मत हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी व्यक्त केले होते.या पार्श्वभूमीवर 'एनसीआरटी'कडून पाठ्यपुस्तकात काही बदल करण्यात आले. त्यानुसार आता 'अवर पास्ट-2' या विभागातील तिसऱ्या आणि दहाव्या धड्यातील छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या मजकुरात 100 शब्दांची भर घालण्यात आली आहे. यामध्ये शिवाजी महाराजांचे गनिमी पद्धतीचे युद्धतंत्र, लहान वयात त्यांनी जिंकलेल्या लढाया आणि त्यांनी कशाप्रकारे भक्कम साम्राज्याची पायाभरणी केली, याबद्दल माहिती देण्यात आली आहे. याशिवाय या धड्यांमध्ये शिवाजी महाराजांचे चित्रही छापण्यात आले आहे. याशिवाय, पेशव्यांचा उल्लेख असणाऱ्या मराठा साम्राज्याविषयीच्या धड्यात पहिल्या बाजीरावाचा उल्लेख करण्यात आहे. बाजीराव हा एक शूर सेनापती होता, त्याने विंध्य पर्वताच्या पलीकडे मराठा साम्राज्याचा विस्तार केला, असे या धड्यात म्हटले आहे. दरम्यान, पाठ्यपुस्तकातील या बदलांविषयी 'एनसीआरटी'चे संचालक हृषिकेश सेनापथी यांना विचारण्यात आले असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र, सर्व नवीन पाठ्यपुस्तके छपाईसाठी पाठवण्यात आली आहेत. येत्या महिन्याभरात ही पाठ्यपुस्तके बाजारपेठेत उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.
अखेर 'एनसीआरटी'च्या पाठ्यपुस्तकात शिवाजी महाराजांचे चित्र छापले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2018 8:48 AM