पुणे : बँकेत ८ वाजताच जाऊन पोहोचलेल्या पुण्यातील विशाल मुंदडा या तरुणाच्या हातात सकाळी सकाळी २०००ची पहिली करकरीत नोट पडली आणि नव्या नोटेच्या नवलाईचा कोण आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसू लागला. आत्तापर्यंत २००० ची नोट व्हॉट्स अॅप आणि सोशल मीडियावरूनच दिसून येत होत्या. १०० आणि ५०० च्या नोटेने तर आदल्या दिवशी दिवसभर छळले होते. कधी एकदा निदान १०० च्या नोटा हातात येतात म्हणून आज सकाळपासूनच तमाम पुणेकरांनी बँकेत धाव घेतली होती. बँकेत एक्स्चेंजमध्ये २००० रु.ची नव्याने चलनात आलेली नोट मिळते, यासाठी सगळेच पुणेकर हरखून गेले होते. विशालने ‘लोकमत’ला त्याचा अनुभव सांगितला. तो म्हणाला, ‘‘मी सकाळी आठ वाजता कॉसमॉस बॅँकेत गेलो होतो. नऊ वाजता बॅँक उघडली. बॅँक कर्मचाऱ्यांसह मी सर्वांत आधी बॅँकेत प्रवेश केला. बँक कर्मचाऱ्यांनी मला पैसे बदलण्यासाठी फॉर्म दिला. मी माझ्या जवळच्या ५००च्या जुन्या नोटा, त्याचे सिरियल नंबर व आधार कार्ड जोडून जमा केले. त्यानंतर कॅशियरने माझ्यासमोर एका भल्या मोठ्या लोखंडीच्या पेटेतून नवीन २००० नोटांचे बंडल काढले. काही क्षण कॅशियरदेखील अवाक् होऊन नोटांकडे पाहात होता. नवीन प्लॅस्टिकचा पातळ थर असलेली अगदी हलकी पहिली नोट हातात घेतल्यानंतर काही वेळ माझा स्वत:वरच विश्वास बसत नव्हता. ही नोट खरी आहे का... मी दोन-तीन वेळा कॅशिअरकडेही विचारणा केली. लहानपणी खेळत असलेल्या व्यापार खेळातील नोटांसारखीच ती २०००ची नोट मला भासत होती. (वार्ताहर)
नव्या नोटेची नवलाई
By admin | Published: November 11, 2016 2:18 AM