मुंबई : केंद्राकडून पाचशे आणि हजारच्या नोटा व्यवहारातून बाद करण्यात आल्यानंतर, एटीएमचे व्यवहार बुधवार, गुरुवारी ठप्प झाले होते. गुरुवारी बँकांचे व्यवहार सुरू झाले आहेत, तर आता शुक्रवारपासून एटीएममधून नवे चलन मिळणे सुरू होणार आहे. परिणामी, चलनात आलेल्या नव्या पाचशे, दोन हजार रुपयांसह शंभर रुपयांच्या नोटा मिळण्याचा मार्गही मोकळा होणार आहे. त्यामुळे ठप्प झालेली आर्थिक व्यवहारांची गाडी पुन्हा पूर्वपदावर येण्यास सुरुवात होणार आहे. आर्थिक व्यवहारातून पाचशे आणि हजारांच्या नोटा बाद झाल्यापासून ग्राहकांच्या डोक्याचा मनस्ताप वाढला आहे. विशेषत: शंभराच्या नोटांची मर्यादा लक्षात घेता आॅनलाइन वगळता रोखीने होणारे खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. गुरुवारपासून बँकांतून नोटा बदलून देण्याची कार्यवाही सुरू झाली असली, तरी प्रत्यक्षात यासाठी बँकांबाहेर झालेली गर्दी लक्षात घेता, आर्थिक व्यवहारावरील ताण अद्यापही हलका झालेला नाही. तरीही त्यातून मार्ग काढण्यासह ग्राहकांचा त्रास कमी करण्यासाठी बँकांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आयसीआयसीआयने ३१ डिसेंबरपर्यंत ग्राहकांकडून एटीएमच्या व्यवहारावर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही, असे म्हटले आहे. या निर्णयाचा कित्ता उर्वरित बँकांकडून गिरवण्यात येईल, अशी दाट शक्यता आहे. दरम्यान, आत्तापर्यंत एटीएमवर महिन्याभरात पाच व्यवहार मोफत होते, परंतु आता ३१ डिसेंबरपर्यंत कितीही वेळा व्यवहार करता येणार आहे. यावर शुल्क आकारण्यात येणार नाही. काही महत्त्वाच्या बँकांकडून सेवासुविधांसाठी अतिरिक्त काउंटरही खुले करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
एटीएममधून आजपासून मिळणार नव्या नोटा
By admin | Published: November 11, 2016 5:33 AM