लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांच्यामागील साडेसाती संपण्याची सध्या तरी चिन्हे नाहीत. शनिवारी सुमारे नऊ तास पोलिसांच्या चौकशीला सामोरे गेल्यानंतर अन्य एका अडचणीला सामोरे जावे लागले आहे. जुहू येथील त्यांच्या अधिश बंगल्यात नियमबाह्यपणे बांधकामाबद्दल मुंबई महापालिकेनेही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्याबाबत आठ दिवसांमध्ये आपले म्हणणे सादर करण्याची सूचना केली आहे.
दिशा सालियन हिच्या बदनामीबद्दल मालवणी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी शनिवारी राणे पिता / पुत्राची नऊ तास चौकशी करण्यात आली. या प्रकरणात दाखल गुन्ह्यात १० मार्चपर्यंत कारवाई न करण्याची सूचना न्यायालयाने दिली असली, तरी पुढील कारवाईची टांगती तलवार कायम आहे. त्यातच पंधरवड्यापूर्वी झालेल्या बंगल्याच्या तपासणीप्रकरणी महापालिकेने रविवारी नव्याने नोटीस बजावली आहे.
महापालिकेच्या पथकाने २१ फेब्रुवारीला राणे यांच्या बंगल्याची कसून पाहणी केली होती. त्यामध्ये मूळ प्लॅनमध्ये बदल करून बंगल्याचे बांधकाम करून एफएसआयचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. तसेच अत्यावश्यक वेळी सुरक्षिततेच्या दृष्टीने मोकळे सोडण्यात आलेल्या जागेवर (रिफ्यूज एरिया) मध्ये बांधकाम करण्यात आले असून त्याबाबत एमआरटीपी ५३ अंतर्गत नोटीस बजावली असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.