अहमदनगर : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्यासह भाजपावर नाराजी व्यक्त करत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे प्रदेश सचिव व प्रवक्ते अशोक गायकवाड यांनी पक्षाचा राजीनामा देत युनायटेड रिपब्लिकन पार्टी स्थापन करण्याची घोषणा केली आहे.गायकवाड यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली़ या वेळी गायकवाड म्हणाले, तडजोडीच्या राजकारणात रिपाइं पक्ष भाजपाबरोबर गेला. भाजपाने मात्र आंबेडकरी जनतेला काहीच दिले नाही़ सत्तेत १० टक्के वाटा देण्याचे आश्वासन त्यांनी पाळले नाही़ भाजपाने कोरेगाव भीमा दंगलीत दलित-मराठा समाजात विष पेरण्याचे काम केले़ या पक्षात काम करत असताना माझ्यासह अनेक कार्यकर्त्यांची घुसमट होत होती, असे त्यांनी सांगितले़दीडशे पदाधिकारी बाहेर पडणारनाशिक येथे ४ आॅगस्ट रोजी समविचारी कार्यकर्ते आणि संघटना एकत्र येऊन ‘युनायटेड रिपब्लिकन’ पक्षाची स्थापना करणार आहेत़ या वेळी रिपाइंमधील सुमारे १५० पदाधिकारी बाहेर पडून नवीन पक्षात सहभागी होणार असल्याचे ते म्हणाले.नवे राजकीय समीकरणगायकवाड यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी नुकतीच पुणे येथे शरद पवार यांची भेट घेतली.नवीन युनायटेड रिपब्लिकन पक्ष आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लढविणार आहे़ त्यामुळे नवी राजकीय समीकरणे जुळण्याची शक्यता आहे़
रामदास आठवलेंच्या रिपाइंत फूट, नव्या पक्षाची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 1:27 AM