मनसे- भाजपा छुप्या युतीचा 'असा' आहे नवा प्लॅन?; महापालिका निवडणुकीपूर्वी राजकीय संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 11:02 PM2021-09-02T23:02:11+5:302021-09-02T23:02:42+5:30

मनसे आणि भाजप यांच्या युतीच्या चर्चा अलीकडे कधी सुरु झाल्या? तर जेव्हा चंद्रकांत पाटील हे राज ठाकरे यांना नाशिकमध्ये भर रस्त्यात भेटले. त्यानंतर चंद्रकांत पाटील थेट राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या निवासस्थानी पोहोचले

Is this the new plan of the hidden MNS-BJP alliance ?; Target Shivsena-NCP-Congress in Election | मनसे- भाजपा छुप्या युतीचा 'असा' आहे नवा प्लॅन?; महापालिका निवडणुकीपूर्वी राजकीय संकेत

मनसे- भाजपा छुप्या युतीचा 'असा' आहे नवा प्लॅन?; महापालिका निवडणुकीपूर्वी राजकीय संकेत

googlenewsNext

मुंबई – राज्यात मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपा या दोन्ही पक्षाचं बिनसलं आणि शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले काँग्रेस-शिवसेना हातात हात घालून राज्याच्या सरकारमध्ये बसले. शिवसेनेच्या या खेळीनं भाजपाला मोठा धक्का बसला. सर्वाधिक जागा मिळूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसायला लागलं. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली. राज्यातील या सत्तातराने महाराष्ट्रातील सगळी राजकीय गणितच बदलून टाकली.

भाजपा नव्या मित्राच्या शोधात आहे मग शिवसेनेला टक्कर देणारा तितक्याच ताकदीचा चेहरा कोण असेल तर मनसे हा भाजपासाठी पर्याय ठरू शकतो. आतापर्यंत तुम्ही मनसे-भाजप युती झाली तर काय होईल? कुणाचा फायदा कुणाचं नुकसान? हे सगळं ऐकून-वाचून झाला असाल, पण आता आपण जाणून घेऊया, मनसे भाजप युती झाली नाही, आणि या दोन पक्षांनी एक जुना फॉर्म्युला, नव्या प्लॅनसह राबवला, तर काय होईल? आता हा फॉर्म्युला काय असू शकतो? या फॉर्म्युल्याच्या आडून मनसे आण भाजपचा प्लॅन काय असू शकतो या विषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  

मनसे आणि भाजप यांच्या युतीच्या चर्चा अलीकडे कधी सुरु झाल्या? तर जेव्हा चंद्रकांत पाटील हे राज ठाकरे यांना नाशिकमध्ये भर रस्त्यात भेटले. त्यानंतर चंद्रकांत पाटील थेट राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या निवासस्थानी पोहोचले. तेव्हापासूनच सगळ्यांच्या नजरा या युतीच्या घोषणेकडे लागलेल्या होत्या.

Image

पण जेव्हा जेव्हा युती होणार का? असा प्रश्न विचारला जायचा, तेव्हा तेव्हा भाजपाने मनसेच्या परप्रांतीयांविषयीच्या भूमिकेकडे बोट दाखवलं. त्यानंतर असं वाटलं की कदाचित हाच एकमेव अडसर असेल, तर मनसे आपली परप्रांतीयांविषयीची भूमिका मवाळ करेल आणि हिंदुत्वांचा झेंडा हाती धरून भाजपसोबत जाईल. पण हे सगळं सुरु असतानाच ठाण्यात एका परप्रातांय फेरीवाल्याने मराठी अधिकारी महिलेवर हल्ला केला. तिची बोटं कापली आणि मनसे पुन्हा परप्रांतीयांविरोधात आक्रमक झाली.  

Image

पोलिसांनी आरोपीला सोडलं तर आम्ही मारू असं राज ठाकरे भर पत्रकार परिषदेत म्हणाले. तर स्वतः राज ठाकरे जखमी अधिकारी महिलेची भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. मनसेची हीच खमकी भूमिका सांगतेय. की मनसेला परप्रांतीयांचा मुद्दा इतक्यात सोडायचा नाहीये. तर मग आता प्रश्न उरतो. परप्रांतीयांचा मुद्दा सोबत घेऊन सुद्धा मनसे-भाजप युती होऊ शकते का? तर याचं उत्तर हो असं आहे.

... मग मनसे-भाजप एकत्र येणार का?

एक चर्चा अशी आहे, की मनसे आणि भाजप हे छुप्या पद्धतीने युती करू शकतील म्हणजे प्रत्यक्षात निवडणुकीपूर्वी हातमिळवणी होणार नाही पण ते शिवसेनेविरोधात आपली ताकद लावतील. आता मनसे आणि भाजप यांची उघड युती करण्यात नेमकी काय अडचण असेल, याविषयी ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सांगतात की, येत्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि मनसे यांची युती होईल अशा पद्धतीची चर्चा होती. परंतु केवळ भाजप बरोबर जायचे म्हणून लागलीच परप्रांतीयांच्या विरोधातील आपली भूमिका मवाळ करायची, हे मनसेला तितकेसे परवडणारे नाही. त्याचबरोबर 'लाव रे तो व्हिडिओ' अशा पद्धतीनं मोदींवर कठोर टीका केलेल्या राज ठाकरे यांच्या बरोबर लागलीच निवडणुकी करता हात मिळवणी करण्याने मोदींचे समर्थक नाराज होण्याची भीती भाजपला वाटत असावी असं त्यांनी सांगितले.

मग आता मनसे- भाजपने छुपी युती करायचं ठरावलं, तर प्लॅन काय असेल? यावर संदीप प्रधान यावर म्हणतात की,  'राज ठाकरे यांनी परप्रांतीयांच्या विरोधात कठोर भूमिका घेऊन उभे राहायचे आणि शिवसेनेची कोंडी करायची, शिवसेनेच्या वॉर्डांमध्ये उमेदवार उभे करून मराठीचा मुद्दा आक्रमकपणे लावून धरायचा. तर भाजपने मोदींच्या करिष्म्यावर आणि शिवसेनेच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवत शिवसेना त्याचबरोबर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बालेकिल्ल्यात निवडणूक लढवायची. निकालानंतर ज्याला जे संख्या बळ प्राप्त होईल त्यानुसार भाजप व मनसेने एकत्र यायचे. अशी काहीशी बदललेली रणनीती सुद्धा हे दोन्ही पक्ष अंगीकारु शकतात. गेल्या दोन दिवसातील मनसेने ठाण्यात परप्रांतीयांच्या विरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेतून तसेच संकेत मिळत आहेत.

कुणाचा फायदा, कुणाचं नुकसान?

आता मुद्दा हा आहे, की मनसे आणि भाजप यांनी छुपी युती केली, तर त्यांना जास्त फायदा होईल? की खुलेआम शिवसेना, महाविकास आघाडीसमोर एकत्र आले, तर फायदा होईल? कारण दोघांसमोर लक्ष्य एकच आहे, की शिवसेनेचं नुकसान करणं. सध्या तरी चर्चेतला हाच छुप्या युतीचा फॉर्म्युला मनसे आणि भाजपसाठी तारक दिसतोय पण हाच फॉर्म्युला शिवसेना आणि महाविकास आघाडीसाठी किती मारक असेल याची चाचपणी हा प्लॅन प्रत्यक्षात उतरवण्याआधी करावी लागेल. कारण त्यावरच या प्लॅनच यश अपयश अवलंबून असेल.

पाहा व्हिडीओ -

Web Title: Is this the new plan of the hidden MNS-BJP alliance ?; Target Shivsena-NCP-Congress in Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.