कोल्हापूर : सेंद्रिय शेतीचे नवे धोरण राज्य शासन लवकरच जाहीर करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, सोमवारी येथे केली. सेंद्रिय शेतीबाबतचे सध्या असलेले राज्याचे धोरण हे बदलत्या परिस्थितीत व काळानुरूप ते अद्ययावत करणे गरजेचे आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती करणारे तसेच त्यात प्रयोग करणारे आणि तज्ज्ञांच्या सूचना मागवून घेऊन नवे धोरण तयार केले जाईल. प्रभावी जलनीती राबवून राज्यातील पाच हजार गावे यंदा दुष्काळमुक्त करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.चौथ्या भारत विकास संगम संमेलनांतर्गत कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी मठावरील भारतीय संस्कृती उत्सवाच्या आरंभोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मठाच्या ६५ एकर जागेत ‘राजर्षी शाहू महाराज नगरी’तील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, तर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गुजरातचे विधि व न्यायमंत्री प्रदीपसिंह जडेजा, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, सिद्धगिरी मठाचे मठाधिपती अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी, विजयपूर कर्नाटकचे सिद्धेश्वर स्वामी, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार धनंजय महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील प्रमुख उपस्थित होते. देशाच्या काना-कोपऱ्यांतून आलेले भाविक, नागरिकांच्या अलोट गर्दी संस्कृती उत्सवाचा आरंभोत्सव झाला.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, स्वयंपूर्ण गावांच्या उभारणीसाठी नवीन सेंद्रिय शेती धोरण आवश्यक आहे. सेंद्रिय शेतीत वैविध्यपूर्ण प्रयोग करणाऱ्यांसह तज्ज्ञांच्या सूचनांना समावेश करून नवे धोरण आणले जाईल. सध्या राज्यात २४ हजार गावे दुष्काळग्रस्त आहेत. जलसंधारण, विकेंद्रित जलसाठा यासाठी नवीन नियोजन केले आहे. यावर्षी पाच हजार गावे दुष्काळमुक्त करणार आहे. त्यासाठी प्रत्येक गावाचे वॉटर आॅडिट करण्यात येईल. या कामासाठी जलसंधारण खात्याला एक हजार कोटींचा निधी जाहीर केला आहे. राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसंधारण व विकेंद्रीत जलसाठे निर्मिती, जलनियोजनाची गरज आहे. त्यासाठी जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविण्यात येईल. गोदावरी खोऱ्याचा ३१ मार्चपूर्वी आढावा घेऊन पाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. ज्ञान-विज्ञान हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्याची गरज असून ग्रामविकासाचा मंत्र सांगणारे प्रकल्प राज्यभर उभारण्यासाठी सरकार मदत करेल. काडसिद्धेश्वर स्वामी म्हणाले, निसर्गाला बाधा न पोहोचविता विकास व्हावा त्यासाठी सेंद्रिय शेती धोरणाला प्रोत्साहन मिळावे. आहारपद्धती भक्कम करण्यासाठी राज्यात सेंद्रिय शेतीचे धोरण राबविण्यात यावे. विशेषत: ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे. संस्कृती जतन करण्यासाठी भारत विकास संगम कार्यरत आहे. त्याअंतर्गत हा उत्सव होत आहे.कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन व गोमातेच्या पूजनाने झाले. खासदार धनंजय महाडिक, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, शिवगंगा प्रकल्पाचे महेश शर्मा, स्वामी मुक्तानंद बापूजी, आचार्य के. एन. गोविंदाचार्य यांची भाषणे झाली. यावेळी भारत विकास संगमचे अध्यक्ष बसवराज पाटील, आमदार सर्वश्री सुरेश हाळवणकर, डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, प्रकाश आबिटकर, संध्यादेवी कुपेकर, अमल महाडिक, माजी ग्रामविकास मंत्री आण्णासाहेब डांगे, बाबा देसाई आदी उपस्थित होते. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी सूत्रसंचालन केले. युवक बिरादरीने विविध गीते सादर केली. दरम्यान, सहा दिवस भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारा, स्वावलंबी शेतीचे प्रयोगांचा समावेश असलेला हा उत्सव रंगणार आहे. (प्रतिनिधी)
लवकरच सेंद्रिय शेतीचे नवे धोरण : फडणवीस
By admin | Published: January 19, 2015 11:52 PM