आमदार अपात्रतेचा निकाल देणार नवी राजकीय दिशा; बुधवारी अंतिम निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 05:59 AM2024-01-09T05:59:42+5:302024-01-09T06:00:18+5:30

विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

New political direction to decide MLA disqualification; Final decision on Wednesday | आमदार अपात्रतेचा निकाल देणार नवी राजकीय दिशा; बुधवारी अंतिम निर्णय

आमदार अपात्रतेचा निकाल देणार नवी राजकीय दिशा; बुधवारी अंतिम निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात २२ जून २०२२ नंतर झालेल्या उलथापालथीनंतर  न्यायालयीन लढाई आणि विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी अशा तब्बल दीड वर्ष चाललेल्या शिवसेना प्रकरणावर बुधवारी अंतिम निकाल येणार आहे. हा निकाल कोणत्या गटाच्या बाजूने लागतो यावर सरकारचे भवितव्य ठरणार आहे. 
निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर राज्य सरकारच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. मात्र, हा निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागला तर सरकारला निर्धोकपणे आपला कार्यकाळ पूर्ण करून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला सामोरे जाता येईल.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पक्ष कुणाचा आणि आमदार अपात्रतेचा मुद्दा आल्याने ते न्यायालयीन लवादाच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे त्यांना निष्पक्षपातीपणे निकाल द्यावा लागणार आहे. सुमारे चार महिने चाललेल्या मॅरेथाॅन सुनावणीनंतर हा निकाल लागेल.

हे प्रकरण इथेच संपणार नाही : अनिल परब

  • अपात्र कुणाला करायचे हा अधिकार अध्यक्षांना आहे. अध्यक्ष कुणाला अपात्र करतात, याची वाट पाहतोय. कारण, विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालयात पुन्हा युक्तिवाद होईल. कदाचित आमदारांना अपात्र केले तर शिंदे गट न्यायालयात जाईल.
  • आम्हाला अपात्र केलं, तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. याचा अर्थ हे प्रकरण इथेच संपत नाही. निकाल कसा आणि कशाच्या आधारावर देतात हे पाहणे महत्त्वाचे आहे, अशी टिप्पणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांनी केली.


ट्रिपल टेस्टचा आधार घेणार का?

  • निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने दिलेला निकाल, यावेळी ग्राह्य धरलेली ट्रिपल टेस्ट, याचाच आधार जर विधानसभा अध्यक्षांनी घेतला तर पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या विरोधात निकाल जाण्याची शक्यता आहे. 
  • ज्यावेळी शिवसेनेत फूट पडली त्यावेळी राजकीय पक्ष कोणाचा होता? जर त्या दिवशी राजकीय पक्ष एकनाथ शिंदेंचा होता, तर मग राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष अशी जी विभागणी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात केली आहे, त्याचा नेमका अर्थ काय? याचा विचार करूनच विधानसभा अध्यक्षांना निकाल द्यावा लागणार असून हा निकाल खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे. कारण या निकालाचे दाखले यापुढे होणाऱ्या प्रत्येक सत्तासंघर्षात प्रमाण ठरणार आहेत.


पहिला भूकंप नार्वेकर काय निर्णय घेतात यावर : पृथ्वीराज चव्हाण

पहिला भूकंप नार्वेकर काय निर्णय घेतात यावर ठरणार आहे. ते यातून अंग काढून घेण्याचीही शक्यता आहे. कारण कुणी म्हणतात राजीनामा देतील, कुणी म्हणतो आजारी पडतील, कुणी म्हणतो वेळ वाढवून मागतील. त्यांनी जर त्यातून अंग काढले आणि निर्णय घेतला नाही, तर मग त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाला पहिला निर्णय घ्यावा लागेल. तो पहिला राजकीय भूकंप असेल, अशी शक्यता काँग्रेस नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवली आहे.

तेव्हा ठाम होतो, आता बोलणार नाही : नरहरी झिरवळ

आमदार अपात्रतेशी माझा काय संबंध? आधी मी ठाम होतो, पण तेव्हा मी तिथे महाविकास आघाडी सरकारमध्ये होतो; परंतु आता मी तिथे नाही, त्यामुळे आता मी यावर बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दिली.

Web Title: New political direction to decide MLA disqualification; Final decision on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.