- मेहरून नाकाडे, रत्नागिरी
मुंबई - गोवा महामार्गावरील महाडनजीक सावित्री नदीवर पूल दुर्घटनेला शुक्रवारी सहा महिने पूर्ण होत आहेत. भू-पृष्ठवाहतूक व नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांनी १८० दिवसांत पूल उभारण्याची घोषणा केली होती. सहा महिन्यात पूल पूर्ण होऊ शकला नाही तरी पुलाचे काम मात्र वेगात सुरू आहे. आजपर्यंत ३५ टक्के बांधकाम पूर्ण झाले असून जूनपर्यंत पूल वाहतूकीस खुला करण्याचा शासनाचा मानस आहे.सावित्री नदीवरील पूल पुराच्या पाण्यात २ आॅगस्ट २०१६ च्या मध्यरात्री वाहून गेला होता. एस. टी.च्या दोन बसेससह खासगी गाड्यांना जलसमाधी मिळाल्याने ३०पेक्षा अधिक लोकांचा दुर्घटनेत बळी गेला. केंद्रीय भू-पृष्ठवाहतूक व नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांनी दुर्घटनास्थळाला भेट देऊन १८० दिवसांत नवीन पूल बांधण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार पुलाच्या बांधकामासाठी ३७ कोटींची निविदा मंजूर करण्यात आली. या दुर्घटनाग्रस्त पुलाजवळ २००० साली बांधलेल्या पुलावरून वाहतूक सुरू आहे. मात्र, नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर एक पूल मुंबईकडे जाण्यासाठी, तर दुसरा पूल गोव्याकडे येणाऱ्या वाहतुकीसाठी वापरला जाणार आहे. १५ जूनपासून वाहतूक सुरू२४० मीटर लांब व १६ मीटर रूंदीचा पूल उभारण्यात येत असून, १०पैकी ३ खांब बांधून पूर्ण झाले आहेत. एक खांब २२ मीटर उंचीचा आहे. उर्वरित ६ खांबांचे बांधकाम ३५ टक्के पूर्ण झाले आहे. नदीपात्रातील पाण्याची पातळी खालावल्यामुळे कामाला गती आली आहे. जूनपर्यंत शंभर टक्के काम पूर्ण करून १५ जूनपासून पुलावरून वाहतूक सुरू होईल, असा विश्वास बांधकाम विभागातील अधिकारी बोलून दाखवित आहेत.