पणजी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रा. सुभाष वेलिंगकर यांना विभाग संघचालक पदावरून हटविल्यानंतर नाराज झालेल्या त्यांच्या समर्थकांनी गोवा राज्यासाठी स्वतंत्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन केला असून, संघाच्या संघचालकपदी वेलिंगकर यांचीच नियुक्ती केली. या आकस्मिक घडामोडीमुळे भाजपामध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.येत्या निवडणुकीत भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या (भाभासुमं) माध्यमातून भाजपाचा पराभव करणार असल्याचे वेलिंगकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले. आजवर गोव्याचा रा. स्व. संघ हा कोकण प्रांताशी जोडला गेला होता. यापुढे कोकण प्रांताशी आमचा कोणताही संबंध नसेल व स्वतंत्रपणे आम्ही काम करू; पण आमची जीवननिष्ठा ही हेडगेवार व गोळवलकर गुरुजी यांच्या संघाशीच जोडली गेलेली आहे, असे नेसवणकर यांनी सांगितले. पदमुक्त करताना कोणतेच पटण्याजोगे कारण दिले नव्हते. संघ राजकीय पक्षाचे काम करू शकत नाही, असे आपल्याला सांगितले गेले; पण मी स्वत: निवडणूक लढवणार नाही हे मी सांगितले होते. भारतीय भाषा सुरक्षा मंचचा मी समन्वयक आहे. त्यामुळे त्या भूमिकेतून मला समाजाच्या चांगल्यासाठी राजकीय काम करावेच लागेल. मी २०१२ साली काँग्रेसचे सरकार असताना काँग्रेसविरुद्ध राजकीय काम केले होते. त्या वेळीही मी भाषा सुरक्षा मंचचा समन्वयकच होतो; पण कोकण प्रांताने त्या वेळी माझ्याविरुद्ध कारवाईही केली नाही व मला त्याबाबत विचारलेही नव्हते, असे वेलिंगकर म्हणाले. आता भाजपाने गोमंतकीयांची मोठी फसवणूक केली आहे. त्यामुळे आम्ही भाजपाविरुद्ध उभे ठाकल्याने कोकण प्रांताला अडचण होत असेल तर तो कोकण प्रांताचा प्रश्न आहे, असे वेलिंगकर म्हणाले. (खास प्रतिनिधी)संघ भाजपाच्या घरी जन्मला नाही- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म हा भाजपाच्या घरात झालेला नाही हे सर्वांनी लक्षात ठेवावे. २०१२ साली आम्ही काँग्रेसला धडा शिकवला, आता भाजपाला धडा शिकवणार आहोत. आम्ही संघ स्वयंसेवकांनी जन्मात कधीच काँग्रेसला मत दिले नाही; पण येत्या निवडणुकीत आम्ही चुकूनदेखील भाजपाला मत देणार नाही, असे वेलिंगकर यांनी जाहीर केले. पर्रीकरांनी फसवणूक केली - गोव्यात संघाचे काम रोजच्याप्रमाणे सुरू राहील. शाखा वगैरे नेहमीप्रमाणेच चालतील. आमची बाजू ही सत्याची आहे. पांडव विरुद्ध कौरव असा हा लढा असून, आमची भूमिका पटलेले अनेक जण भाजपसमध्येही आहेत, त्यांनी कौरवांची साथ सोडून आमच्या बाजूने यावे, असे आवाहन करत मनोहर पर्रीकर यांनी गोव्याची मोठी फसवणूक केली, असा आरोप वेलिंगकर यांनी केला.फूट टाळण्यासाठी पदमुक्ती - संघाची स्पष्टोक्तीनागपूर : गोव्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील संभाव्य फूट टाळण्यासाठी संघाने सारवासारव करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. वेलिंगकर यांची भाजपाविरोधातील पावलांमुळे उचलबांगडी करण्यात आली नसून त्यांना संघ परंपरेनुसार जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे, असे संघाने आज जाहीर केले.शिक्षणाच्या माध्यम प्रश्नावरून ‘भारतीय भाषा सुरक्षा मंच’च्या बॅनरखाली सुभाष वेलिंगकर यांनी गोव्यातील भाजपा सरकारविरोधात आंदोलन छेडले होते. इंग्रजी माध्यमांच्या विद्यालयांना देण्यात येणारे अनुदान बंद करण्याची ‘बीबीएसएम’ची मागणी आहे. यामुळे भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी संघाच्या केंद्रीय नेत्यांकडे वेलिंगकर यांची पदावरून हकालपट्टी करण्यासाठी मनधरणी केली होती. यानंतर वेलिंगकर यांची संघचालकपदाची सूत्रे संघाकडून काढून घेण्यात आली. परंतु यामुळे गोव्यातील संघवर्तुळात खळबळ माजली व गोवा संघ कार्यकारिणीतील अनेक जण वेलिंगकर यांच्या पाठीशी उभे राहिले.वेलिंगकर यांची उचलबांगडी करण्यात आलेली नाही. त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे, असे संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी स्पष्ट केले. संघ राजकारणात सक्रिय नाही व नवीन राजकीय पक्षाच्या स्थापनेत संघाची कुठलीही भूमिका नाही. संघाच्या परंपरेनुसार त्यांना पदावरून मुक्त करण्यात आले आहे, असे वैद्य म्हणाले.
गोव्यात नवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन!
By admin | Published: September 02, 2016 2:01 AM