मुंबई : राज्य सरकारने फेरीवाला धोरणांतर्गत तयार केलेल्या नव्या नियमावलीला मुंबई हॉकर्स युनियनने तीव्र विरोध केला आहे. १५ मार्चपर्यंत नियमावली रद्द केली नाही, तर १७ मार्चला मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.याआधी ६ डिसेंबरला राज्य सरकारने एक नवी नियमावली मुंबई महापालिका आयुक्तांना पाठवल्याचा दावा संघटनेचे चिटणीस दिनेश तावडे यांनी केला आहे. नव्या नियमावलीतील अटी खूपच जाचक असून, त्याआधारे कायदा तयार केल्यास मुंबई शहर आणि उपनगरांत एकही फेरीवाला फेरीचा धंदा करू शकणार नाही, असा तावडे यांचा आरोप आहे. त्यामुळे तत्काळ नवी नियमावली रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.नवी नियमावली तयार करताना फेरीवाला संघटनांच्या प्रतिनिधींसोबत सविस्तर चर्चा करण्याची मागणी संघटनेने केली आहे. परवाने देण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणात फेरीचा धंदा न करणाऱ्या व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात घुसखोरी केल्याचा संघटनेचा आरोप आहे. त्यामुळे पुन्हा सर्वेक्षण करण्याची संघटनेची मागणी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही फेरीवाल्यांवर पालिका अधिकारी कारवाई करीत असल्याचे संघटनेने सांगितले.
नव्या नियमावलीला फेरीवाल्यांचा विरोध
By admin | Published: January 29, 2015 5:52 AM