मुंबई : रेल्वे अर्थसंकल्पातून मुंबई उपनगरीय रेल्वेला दिलासा देण्यात आल्यानंतर आता एप्रिल महिन्यापासून लागू होणाऱ्या नवीन लोकल वेळापत्रकातून दिलासा मिळतो की नाही हे पाहण्यासारखे ठरेल. मध्य रेल्वे लोकलचे नवीन वेळापत्रक एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून लागू केले जाणार आहे. या वेळापत्रकात दिवासाठी आणखी दहा जलद लोकल फेऱ्यांचा समावेश करण्यात येईल. त्याचबरोबर ट्रान्स हार्बर प्रवाशांनाही दिलासा देताना १0 वाढीव फेऱ्या मिळतील. मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे ते कल्याण आणि ठाणे ते वाशी, पनवेलचा प्रवास दिवसेंदिवस जिकिरीचा होत चालला आहे. त्यामुळे या मार्गावरील लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात याव्यात, अशी मागणी केली जाते. दिवा स्थानकात तर जलद लोकल फेऱ्यांना थांबा देण्यात यावा, या मागणीसाठी आंदोलनही करण्यात आले आणि ही मागणी लक्षात घेता आॅक्टोबर २0१६ पासून अप आणि डाऊन मार्गावर मिळून २४ फेऱ्यांना थांबा देण्यात आला. परंतु यात कर्जत, अंबरनाथ यासह लांबच्या अंतरावरील गाड्यांचा समावेश होता. त्यामुळे गर्दीच्या वेळेत या गाड्यांचा फारसा फायदा दिवावासीयांना मिळत नव्हता. आणखी जलद लोकल फेऱ्या मिळाव्यात, अशी मागणी पुन्हा होत असल्याने या मार्गावरील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी आणखी १0 जलद फेऱ्यांना थांबा देण्याचा विचार असल्याचे रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. एप्रिल महिन्यात लोकलचे नवीन वेळापत्रक येणार असून त्यात या फेऱ्यांचा समावेश असेल, अशी माहिती देण्यात आली. ठाणे ते वाशी, पनवेल मार्गावरीलही प्रवाशांची संख्या वाढत आहे. या मार्गावर २३२ लोकल फेऱ्या होतात. नवी मुंबईत दिवसेंदिवस मोठ्या संख्येने उभी राहणारी संकुले आणि कार्यालये यामुळे येथील लोकसंख्येत वाढ होत असून, ठाणे ते पनवेल, वाशी या ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकललाही गर्दी होताना दिसते. त्यामुळे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता मध्य रेल्वेकडून फेऱ्या वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. गेल्या १० वर्षांत तब्बल २१0 फेऱ्यांची भर पडली आहे. नवीन वेळापत्रकात आणखी दहा लोकल फेऱ्या वाढवण्यावर भर असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे लोकल फेऱ्यांची संख्या ही २३२ वरून २४२ होईल. २00६-0७ मध्ये याच मार्गावर साधारण तीन ते चार लोकलच्या २२ फेऱ्या चालविण्यात येत होत्या. २00८-0९ मध्ये त्यात १0४ फेऱ्यांची भर पडली. त्यानंतर दर दोन वर्षांनी लोकल फेऱ्या वाढविण्याचे नियोजन मध्य रेल्वेकडून करण्यात आले. (प्रतिनिधी)
मध्य रेल्वेवर एकूण १६५८ लोकल फेऱ्या दिवसभरात होतात. यात ८३६ फेऱ्या या मेन लाइनच्या, हार्बरच्या ५९0 तर ट्रान्स हार्बरच्या २३२ फेऱ्या होतात. मेन लाइनवर लोकल फेऱ्या वाढवण्याची क्षमता संपुष्टात आली आहे.त्यामुळे या मार्गावरील फेऱ्या वाढवायच्या की नाही यावर विचार केला जात आहे. हे पाहता कमी अंतराच्या लोकल फेऱ्यांचा विस्तार करण्यावरच भर दिला जाईल.