पुणे : रेल्वे मंत्रालयाने जाहीर केल्याप्रमाणे स्वातंत्र्य दिनापासून देशातील रेल्वेगाड्यांचे नवीन वेळापत्रक लागु केले जाणार आहे. या वेळापत्रकामध्ये पुणे विभागातील गाड्यांच्या वेळापत्रकात फारसा बदल झालेला नाही. पुणे स्थानकातून सुटणाऱ्या बहुतेक एक्सप्रेस गाड्यांच्या वेळा पुर्वीप्रमाणे असतील. केवळ काही लोकल, डेमू व पॅसेंजर गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे-दौंड डेमू, लोणावळा ते पुणे आणि पुणे ते सातारा मार्गावरील काही गाड्यांचे वेळापत्रक प्रवाशांच्या मागणीनुसार बदलण्यात आले आहे. तर काही एक्सप्रेस गाड्यांचे वेळा प्रवाशांसाठी अनुकूल करण्यात आल्या आहेत. सुधारीत वेळापत्रकानुसार लोणावळ्याहून ९९८०५ क्रमांकाची लोकल सकाळी ७.४० सुटून पुणे स्थानकात ९.१५ वाजता पोहचेल. पुणे-दौंड डेमु (७१४०९) ही दुपारी २.४० वाजताची गाडी आता २.४५ वाजता रवाना होईल. प्रवाशांच्या मागणीनुसार पुणे-सातारा पॅसेंजर (५१४३५) या गाडीचा वेग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. पुर्वी ही गाडी सायंकाळी ५.०५ वाजता पुणे स्थानकात सोडण्यात येत होती. आता ही गाडी ६.१० वाजता साताऱ्याकडे प्रस्थान करून १०.२५ वाजता पोहचेल. कोल्हापुर-पुणे (५१४१०) या पॅसेंजरचा वेगही वाढविला जाणार आहे. त्यामुळे ही गाडी पुवीर्पेक्षा पावणे दोन तास लवकर म्हणजे २.४० वाजता पुण्यात पोहचेल. पुणे-दौंड (७१४०७) व दौंड-पुणे (७१४०८) या डेमु गाड्यांना नियमित करण्यात आले आहे. या गाड्या अनुक्रमे पुण्याहून पहाटे ३.१५ वाजता तर दौंडहून पहाटे ५.४० वाजता सुटतील. दुपारी १२.५० वाजता सुटणारी कोल्हापुर-अहमदाबाद (११०५०) एक्सप्रेस आता १२ वाजून २० मिनिटांनी सुटणार आहे. तर पुणे-जयपुर (१२९३९) व पुणे-इंदौर (२२९४३) एक्सप्रेस या गाड्या दुपारी ३.३५ ऐवजी दुपारी साडे तीन वाजता रवाना होतील. कोल्हापुर-तिरूपती हरीप्रिया (१७४१६) एक्सप्रेसची वेळ पाच मिनिटे अलीकडे करण्यात आली आहे. ही गाडी आता सकाळी ११.३० वाजता कोल्हापुर स्थानकातून सुटेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.---------
रेल्वेचे नवीन वेळापत्रक बुधवारपासून लागु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 9:40 PM
रेल्वे मंत्रालयाने जाहीर केल्याप्रमाणे स्वातंत्र्य दिनापासून देशातील रेल्वेगाड्यांचे नवीन वेळापत्रक लागु केले जाणार आहे.
ठळक मुद्देकेवळ काही लोकल, डेमू व पॅसेंजर गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या