मुंबई : राज्यात सात नवीन सरकारी वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. आघाडी सरकारच्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळात एकही वैद्यकीय महाविद्यालय आले नाही. आता मात्र उस्मानाबाद, परभणी, रायगड, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत सांगितले.राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आणि भाजपचे सुजितसिंह ठाकूर यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. राज्यात सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी निश्चित केलेल्या ७०-३० च्या फॉर्म्युल्यात बदल करण्याची मागणी केली. या फॉर्म्युल्यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर प्रवेश प्रक्रीयेत अन्याय होत असल्याची बाबही चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिली. त्यावर हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून याबाबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक बोलावली जाईल असे आश्वासन महाजन यांनी दिले. तसेच भाजप सत्तेवर आल्यापासून चार वर्षांत बारामती, चंद्रपूर, जळगाव, गोंदियामध्ये वैद्यकीय महाविद्यालये उभारल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात नवी सात शासकीय वैद्यकीय महाविद्यालये!, गिरीश महाजन यांनी केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 5:10 AM