मुंबई : मुदत संपलेल्या आणि नादुरुस्त असलेल्या एसी शिवनेरी बसेस अजूनही प्रवाशांच्या माथी मारल्या जात आहेत. नवीन एसी शिवनेरी बसेस येण्यासाठी महामंडळाकडून निविदा प्रक्रिया अजून सुरूच असून, साधारपणे आणखी तीन महिन्यांचा कालावधी या बसेस ताफ्यात दाखल होण्यासाठी लागतील एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. एसटीच्या ताफ्यात सध्याच्या घडीला ११0 एसी शिवनेरी बसेस असून, यामध्ये फक्त २४ बसेस एसटीच्या स्वत:च्या मालकीच्या आहेत. भाडेतत्त्वावर असलेल्या ८६ पैकी २५ बसची तीन वर्षांची मुदत कधीच संपली होती. मात्र ही मुदत संपुष्टात आल्यानंतरही त्या प्रवाशांच्या सेवेसाठी धावत होत्या. परंतु मुदत संपलेल्या आणि नादुरुस्त बस असल्याने प्रवाशांची चांगलीच वाताहत झाली. तरीही या बसच्या कंत्राटदारांना एक वर्षाची मुदत वाढवून देण्यात आली आणि आता ही मुदत लवकरच संपुष्टात येत असली, तरीही नवीन आणि भाड्यावरील बस घेण्यासंदर्भात ठोस असे पाऊल उचलण्यात आलेले नाही. स्वत:च्या मालकीच्या २५ नवीन बस आणि ३५ भाड्याच्या एसी शिवनेरी बस ताफ्यात आणण्याचा निर्णय घेतला. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून हा निर्णय प्रत्यक्षात उतरलेला नाही. एसी बस घेण्यासंदर्भात फक्त ठराव, घोषणा आणि निविदा प्रक्रियाच सुरू असल्याचे दिसते. महामंडळाकडून स्वत:च्या मालकीच्या आणि भाड्याच्या बस घेण्यासाठी निविदा प्रक्रिया काढण्यात आली आहे. परंतु भाड्याच्या बस घेण्यासंदर्भात काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळत नसल्याचे एसटीतील अधिकारी सांगतात. तर स्वत:च्या मालकीच्या बस घेण्यासंदर्भातील निविदा प्रक्रिया अजूनही सुरूच असल्याचे सांगण्यात आले आहे.
नवीन ‘शिवनेरी’साठी प्र्रतीक्षा वाढली
By admin | Published: March 16, 2015 3:32 AM