मुंबई - गर्भलिंग निदान वक्तव्यावरुन अडचणीत आलेल्या कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या समर्थनार्थ तरुणाई पुढे सरसावली आहे. सोशल मीडियावर सर्वाधिक क्रेझ असणाऱ्या इंदोरीकर महाराजांवर नवीन गाणं काढण्यात आलं आहे. या गाण्याला तरुणाई सर्वात जास्त पसंती देत आहे. ताई, आता बस्स कर, फक्त महाराज इंदोरीकर अशा शब्दात असणाऱ्या या गाण्यावर तरुणाई थिरकत आहे.
इंदोरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्यामुळे महिलांचा अपमान झालेला असून त्यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा यासाठी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आक्रमक पवित्रा घेतला. अहमदनगर येथे जाऊन त्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल न झाल्यास त्यांना काळं फासू असा इशारा दिला होता. मात्र इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अनेक संघटना उतरल्या, तसेच टिकटॉक या प्रसिद्ध अॅपवरही तरुणाईने इंदोरीकर महाराजांना पाठिंबा दिला आहे.
तृप्ती देसाई यांच्या निषेधासाठी आणि इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ हे नवीन गाणं व्हायरल झालंय, यामध्ये ताई आता बस्स कर, फक्त महाराज इंदोरीकर असं म्हणत इंदोरीकरांनी समाज प्रबोधनासाठी केलेलं काम, तसेच तमाशापुढे बसणारा समाज आज कीर्तनासमोर बसायला लागला याचं श्रेय इंदोरीकर महाराजांचे आहे. त्यामुळे त्यांची बदनामी करणं बंद करा अशा आशयाचं गाणं प्रसिद्ध झाले आहे.
अकोले तालुका बंदइंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आज अकोले तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. त्यासाठी कडकडीत बंद पाळण्यात येत असून इंदोरीकरांच्या समर्थकांनी गावागावातून बाईक रॅली, टाळमृदंगाच्या गजरात दिंडीचे आयोजन केले आहे.
दरम्यान, इंदोरीकर महाराजांचा महिलांवरील जुना व्हिडिओ व्हायरल करुन मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी तृप्ती देसाईंवर पुन्हा निशाणा साधला. या व्हिडिओत इंदोरीकर महाराज मुलींचे महत्त्व समाजाला कीर्तनातून सांगत असल्याचं दिसतं. या व्हिडिओत महाराज म्हणतात की, १ हजार मुलांमध्ये ९३५ मुली असा जन्मदर आहे. ६५ मुली हजाराला कमी आहे, याला एकमेव कारण सोनोग्राफी आहे, मुलगी व्हायलाच पाहिजे, जगातील सर्वात मोठं पाप स्त्रीभ्रूण हत्या आहे. काही महिला मुलगी झाल्यावर तोंड पाडतात पण का? तुम्ही पण मुलगी होता ना, तुमच्या बापाने जमिनी विकून का होईना तुम्हाला सुखी केलं ना, मग मुलगी व्हायलाच पाहिजे. लग्न साधं केलं तरी पोरं होतात, पैशाचं सोंग आणता येत नाही, शेतकऱ्याने जोडधंदा करा, पण मुलगी शिकवा, मुलींसाठी अनेक योजना सरकार देतं त्याचा फायदा घ्या असं महाराज सांगताना दिसतात.
महत्त्वाच्या बातम्या
इंदोरीकर महाराजांचा 'हा' व्हिडिओ बघाच; मनसेचा तृप्ती देसाईंना टोला
कीर्तनातील 'त्या' वादग्रस्त विधानावरुन इंदोरीकर महाराजांनी केला मोठा खुलासा; कारवाई टळली
इंदोरीकर महाराजांची शैली कीर्तन परंपरेला बाधा आणणारी ; सदानंद मोरे
अखेर इंदोरीकर महाराजांनी दिलं नोटिशीला वकिलामार्फत उत्तर, म्हणतात की...
मनसेचा तृप्ती देसाईंना इशारा; इंदोरीकर महाराजांना काळं फासण्याचा प्रयत्न केल्यास...