मुंबई : फेररचनेत ८० टक्के वॉर्डमध्ये बदल झाल्याने आधीच अडचणीत आलेल्या नगरसेवकांना आरक्षणाने बेहाल केले. महापौर, विरोधी पक्षनेते, गटनेते असे सर्वच आरक्षणात गारद झाले. महिला आरक्षणामुळे काही नेत्यांसाठी आजूबाजूच्या वार्डचा मार्गही बंद झाला आहे, तर या आरक्षणातून बचावलेल्या नगरसेवकांना फेररचनेचा फटका बसला आहे. जुन्या वॉर्डचे तुकडे होऊन नवाच वॉर्ड वाट्याला आल्याने नगरसेवक चक्क हवालदिल झाले आहेत. त्यामुळे २०१७ची निवडणूक नगरसेवकांसाठी चुरशीचे आव्हानच ठरणार आहे.मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग, महिला आरक्षणाची सोडत आज वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात काढण्यात आली. यामध्ये अनुसूचित जातीसाठी १५, जमातीसाठी दोन, इतर मागासवर्गासाठी ६१ तर महिलांसाठी राखीव असलेल्या ७४ अशा एकूण १५२ प्रभागांची सोडत या वेळी काढण्यात आली. मात्र, फेररचनेत शहर भागातील सात वॉर्ड उपनगरकडे वळवण्यात आल्याने विभागांची रचनाच बदलली आहे. यामुळे पुनर्रचनेमुळे अनेकांचे वॉर्ड गायब झाले आहेत. सर्वच राजकीय पक्षातील नगरसेवकांच्या प्रभागावर पुनर्रचनेची कुऱ्हाड कोसळली आहे. अभूतपूर्व गोंधळ फेररचनेमध्ये आपला वॉर्ड किती ठिकाणी विभागला गेला, याबाबत नगरसेवक अजूनही संभ्रमातच आहेत. त्यामुळे आरक्षणातून वाचलेल्या नगरसेवकांना आता आपल्या वॉर्डचा अभ्यास करून आपले मतदार कोण, याच शोध घ्यावा लागणार आहे, यासाठी त्यांच्याकडे केवळ दोन ते तीन महिन्यांचा अवधी आहे.नगरसेवकांचे मार्ग बंद काही नगरसेवकांचे वॉर्ड व त्यांच्या आसपासचे वॉर्डही आरक्षित झाल्यामुळे त्यांची राजकीय कारकिर्द धोक्यात आली आहे. मनसेचे संदीप देशपांडे यांचा वॉर्ड व आसपासचे सर्व वॉर्ड महिला आरक्षित झाले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कमी पर्याय उरले आहेत, तसेच समाजवादीचे गटनेते रईस शेख यांचा वॉर्ड गेल्यामुळे, उपनगरातील या नगरसेवकाने शहरातील वॉर्डमध्ये निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. या प्रस्थापितांना फटकानगरसेवकांनी गेली पाच वर्षे आपल्या जनसंपर्क आणि कामाने बांधलेल्या वॉर्डचे फेररचनेत तीन-चार भाग झाले आहेत. याचा फटका विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा, महापौर स्नेहल आंबेकर, भाजपा गटनेते मनोज कोटक, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर अशा काही प्रस्थापितांना बसला, तर राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ, मनसेचे गटनेते संदीप देशपांडे, समाजवादीचे गटनेते रईस शेख, आरोग्य समितीचे अध्यक्ष प्रशांत कदम, शिवसेनेचे नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र नगरसेवक अभिषेक घोसाळकर, मनसेचे मनीष चव्हाण, सुधीर जाधव यांची विकेट आरक्षणात गेली आहे.वॉर्ड फुटल्यामुळे मतदार विखुरले गेले आहेत. त्यामुळे काही नगरसेवकांपुढे त्या तीन विखुरलेल्या वॉर्डमध्ये निवडणूक लढवण्याचा पर्याय आहे, परंतु इच्छुक अनेक असल्याने नगरसेवकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. यात ज्याचे पक्षात वजन जास्त, त्याचीच सरशी होऊ शकेल, तरीही आपले अस्तित्व नगरसेवकांना पुन्हा एकदा सिद्ध करावे लागणार आहे.
मुंबईत येणार नवे भिडू, नवे राज्य
By admin | Published: October 04, 2016 5:36 AM