- राजेश निस्ताने, यवतमाळलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रेकॉर्ड केलेला आवाज लाचखोराचाच आहे की नाही, याची शहानिशा आता राज्यातील सर्व विभागीय मुख्यालयी होऊ शकेल. प्रादेशिक न्याय साहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत ही ‘तासी’ (टेप आॅथेंटिकेशन अॅण्ड स्पीकर आयडेन्टीफिकेशन) सिस्टीम उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत मुंबईवर पडणारा याचा ताण कमी होणार आहे. १ आॅगस्टपासून विभागीय मुख्यालयी आवाज तपासणीची प्रकरणे पाठवावी, अशा सूचना राज्य शासनाच्या न्याय साहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे प्रभारी संचालक तथा शासकीय रासायनिक विश्लेषक बा.ब. दौंडकर यांनी केल्या आहेत. राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांना यासंबंधीचे आदेश २० जुलै रोजी देण्यात आले आहेत. एसीबीकडे लाच मागितल्याची तक्रार आल्यानंतर पंचांसमक्ष त्याची खात्री केली जाते. अनेकदा आवश्यकतेनुसार लाचेच्या मागणीचे गुप्तपणे रेकॉर्डिंग केले जाते. त्यानंतर त्याला रंगेहाथ पकडून गुन्हा दाखल करून तपास केला जातो. त्यादरम्यान रेकॉर्डिंग केलेला आवाज लाचखोराचाच आहे की नाही, याची तपासणी केली जाते. रेकॉर्डिंग अहवालाला लागणाऱ्या विलंबामुळे दोषारोपपत्र दाखल करण्यास, खटल्याचा निकाल लागण्यास विलंब होत होता. ही अडचण लक्षात घेऊन राज्यातील सर्वच विभागीय मुख्यालयी उपलब्ध असलेल्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. - सायबर गुन्ह्यांचा तपास करतानासुद्धा अशाच अडचणी होत्या. केवळ मुंबईत तपासणीची सोय होती. परंतु आता विदर्भासाठी नागपुरात आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी पुण्यात स्वतंत्र संगणक-सायबर फॉरेन्सिक प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. कोकण, मराठवाडा, खान्देश व उत्तर महाराष्ट्राला मुंबईशी जोडण्यात आले आहे.पश्चिम विदर्भातील यवतमाळसह पाच जिल्ह्यांसाठी अमरावतीमध्ये ‘तासी’ सुविधा उपलब्ध झाली आहे. या लॅबमुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे खटले वेगाने निकाली निघण्यास मदत होणार आहे.- विजय ठाकरे, प्रादेशिक न्याय साहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा, अमरावती
आवाज तपासणीसाठी नवीन ‘तासी’ प्रयोगशाळा
By admin | Published: August 01, 2015 2:12 AM