मुंबई : उपनगरात दिवसेंदिवस वाढत जाणारी प्रवासी संख्या आणि ट्रेनच्या सेवांवर पडणारा ताण पाहता नवे रेल्वे टर्मिनस उभारण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शुक्रवारी दिली. विलेपार्ले स्थानकात नव्या पादचारी पुलाचे लोकार्पण तसेच खार स्थानकातील नव्या पादचारी पुलाचा कोनशिला समारंभही प्रभू यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले, मुंबईसाठी ४0 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प राबविण्यात येणार असून, यामध्ये चर्चगेट-विरार एलिव्हेटेड प्रकल्प दोन टप्प्यांत पूर्ण केला जाईल. त्याचबरोबर छोट्या रेल्वे स्थानकांच्या विकासावरही भर देण्यात येणार आहे. विलेपार्ले स्थानकातील नव्या पादचारी पुलामुळे सहाव्या मार्गिकेतील अडथळा दूर होणार आहे. मिलन सब-वेमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. तसेच हा सब-वे नादुरुस्त असून लवकरच त्याच्या दुरुस्तीचे काम पालिकेच्या सहकार्याने घेतले जाणार असल्याचे प्रभू यांनी सांगितले. पश्चिम रेल्वेच्या सर्व स्थानकांचे सुशोभीकरणही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या समारंभाला मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक जी. सी. अग्रवाल आणि खासदार उपस्थित होते. (प्रतिनिधी)कॉलेजच्या आठवणी ताज्या झाल्या : गुरुवारी करी रोड ते सीएसटी असा लोकलमधून प्रवास केल्यानंतर प्रभू यांनी शुक्रवारी खार ते विलेपार्ले दरम्यानही लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास केला. महाविद्यालयात शिकत असताना खार रोड स्थानक ते विलेपार्ले असा लोकल प्रवास केला आणि आज पुन्हा एकदा असा प्रवास करताना त्या जुन्या आठवणी ताज्या झाल्याचे प्रभू यांनी म्हटले.
उपनगरात रेल्वेचे नवे टर्मिनस
By admin | Published: April 23, 2016 4:25 AM