सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यानं नवा ट्विस्ट; अजित पवार-शरद पवार पुन्हा एकत्र येणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 10:05 AM2024-03-06T10:05:45+5:302024-03-06T10:06:56+5:30
लोकसभा निवडणूक कुठल्याही क्षणी घोषित होऊ शकते अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अद्यापही पवार कुटुंब पुन्हा एक होतील का अशी शंका आहे.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे २ पक्ष झाले, मूळ पक्ष हा अजित पवार यांना मिळाला तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि तुतारी चिन्ह शरद पवार गटाला मिळाले. आता शरद पवार आणि अजित पवार यांच्यात थेट लढाई पाहायला मिळतेय. काही दिवसांवरच लोकसभा निवडणुकीची घोषणा होईल. अशा परिस्थितीत खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या एका विधानानं राजकारणात नवा ट्विस्ट येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. सुळेंच्या या विधानानं अनेकांच्या भूवयाही उंचावल्या आहेत.
पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझे कुणासोबतही वैचारिक मतभेद असतील परंतु मनभेद नाहीत. ही लोकशाही प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फूट नाही त्याचसोबत पवार कुटुंबातही फूट नाही. आमच्या कुटुंबात जे काही होते त्यात मला, शरद पवारांना, रोहित पवारांना कुणाच्याही खाजगी आयुष्याविषयी बोलण्याचा अधिकार नाही. कारण आम्ही लोकप्रतिनिधी असलो तरी आमच्या कुटुंबातील लोकांना त्यांचे खाजगी आयुष्य जगण्याचा आणि ते खाजगी ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच कुणी कसं वागायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु ही लोकशाही आहे त्यात चर्चा झालीच पाहिजे. आपण आपलं खाजगी आयुष्य आणि राजकीय आयुष्य हे एकत्र करू शकत नाही. तेवढे वय आणि वैचारिक प्रगल्भता आमच्यात आली आहे. मी लोकशाहीत काम करते. मी माझे वैयक्तिक संबंध कधीच लपवलेले नाहीत. माझे वैयक्तिक संबंध सगळ्याच पक्षाच्या लोकांसोबत असतात. लोकशाहीत मी सगळ्यांच्याच संपर्कात आहे असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुर दौऱ्यावर असताना आमचे फाटे आता वेगळे झालेत असं विधान केले होते. आगामी निवडणुकीला सामोरे जाताना कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होऊ नये म्हणून योग्य तो संदेश देण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केला. तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांच्या या विधानानं पुन्हा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट नाही आणि पवार कुटुंबातही फूट नाही, कुटुंबात जे काही होते ते खासगी आहे असं विधान केल्यानं राजकीय चर्चा सुरू झाली आहे.