लोणावळा : पर्यटनाचे मुख्य केंद्र असलेल्या लोणावळा व खंडाळा शहराची तहान भागविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या नवीन पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत मंजुरी मिळाली आहे. योजनेसाठी ३३ कोटी ४८ लाख ६१ हजार ७११ रुपयांचा निधी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आला असल्याचे अधिकृत पत्र नगर परिषदेला प्राप्त झाले आहे.नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी व मुख्याधिकारी सचिन पवार यांनी ही माहिती दिली. मागील आठवड्यात सीएमओकडून महाराष्ट्रातील काही पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळाली असल्याचे ट्विटरवरून प्रसिद्ध करण्यात आले होते.लोणावळा नगर परिषदेच्या वतीने मागील काही वर्षांपासून नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. यासाठी जागा ही मोठी अडचण होती. मात्र, पांगळोली कैवल्यधाम येथील डोंगरावर उंच ठिकाणी या प्रकल्पासाठी जागा उपलब्ध झाल्यानंतर नगर परिषदेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करून राज्य शासनाकडून ही योजना मंजूर करून आणली आहे. सदरची योजना कार्यान्वित झाल्यानंतर व सध्या अस्तित्वात असलेल्या नांगरगाव येथील जलशुद्धीकरण प्रकल्प वाढीव क्षमतेसह सुरू झाल्यानंतर लोणावळा व खंडाळा शहरांना मुबलक व शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार आहे. शहराच्या उंच भागात हा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याने विविध भागांमध्ये असलेल्या पाण्याच्या टाक्यांना ग्रॅव्हिटीने पाणी जाणार असून, खर्चदेखील कमी होणार आहे. योजनेच्या खर्चापैकी ८५ टक्के वाटा (२८.४६३ कोटी) हा महाराष्ट्र शासनाचा व १५ टक्के वाटा (५.०२३ कोटी) हा नगर परिषदेचा असणार आहे. शासनाच्या वाट्याचा निधी हा तीन टप्प्यांत नगर परिषदेला देण्यात येणार आहे. योजनेच्या कामकाजाचे पहिल्या वर्षात संपूर्ण संगणकीकरण करणे, पहिल्या वर्षात किमान ८० टक्के वसुली व त्यापुढील वर्षात ९० टक्के पाणीपट्टीवसुलीचे बंधन नगर परिषदेला घालण्यात आले आहे. योजना नगर परिषद राबविणार असून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे या योजनेवर प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम पाहणार आहे. त्रयस्थ संस्थेकडून वेळोवेळी कामाचे आॅडिट करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.योजनेच्या पहिल्या टप्प्यात ९० किमी अंतराची व दुसऱ्या टप्प्यात ४० किमी अंतराच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. यासह पांगोळी येथे १० दशलक्ष लिटर क्षमतेची टाकी, हनुमान टेकडी, रामनगर व भुशी या गावांमध्ये पाण्याच्या उंच टाक्या, नांगरगाव येथे ८ लाख लिटर क्षमतेची टाकी, गोल्डव्हॅली येथे १०.७ लाख लिटर क्षमतेची टाकी व खंडाळा फोरबे येथे दीड लाख लिटर क्षमतेची टाकी उभारण्यात येणार आहे. योजना कार्यान्वित झाल्यानंतर देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ही नगर परिषदेची असणार आहे.(वार्ताहर)>कर चुकविणाऱ्यांच्या मिळकती जप्त करणारलोणावळा : लोणावळा नगर परिषदेच्या वतीने मिळकतकर व पाणीपट्टी वसुलीची धडक मोहीम हाती घेण्यात आली असून, कराचा भरणा न करणाऱ्यांची मिळकत जप्त करणार असल्याचे मुख्याधिकारी सचिन पवार व कर निरीक्षक सुरेश गायकवाड यांनी सांगितले.गायकवाड म्हणाले, ‘‘सर्व मिळकतधारकांना कराचा भरणा करण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत. कर भरण्याचा हा शेवटा महिना असताना काही मंडळी कर भरणा करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. अशांची मिळकत ताब्यात घेण्यात येणार असून कर न भरणाऱ्यांची नावे नागरिकांना माहिती व्हावीत याकरिता मुख्य चौकांमध्ये लावण्यात येणार आहेत.’’ लोणावळा नगर परिषदेचे १०० टक्के करवसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. याकरिता नागरिकांनी सहकार्य करून कराचा भरणा करावा, असे आवाहन नगर परिषदेने केले आहे. या करिता कार्यालयीन कामाकाजांच्या वेळांसह शनिवार व रविवार, तसेच शासकीय सुट्यांच्या काळात देखील नगर परिषद कार्यालय सुरु ठेवण्यात आले आहे.
नवीन पाणी योजना मंजूर
By admin | Published: March 07, 2017 1:36 AM