मुंबई : उत्तर भारत कडाक्याच्या थंडीने गारठला असतानाच राज्यातही कमालीची थंडी पडली आहे. विशेषत: मागील आठवड्याभरापासून राज्यात थंडीची लाट असून, मुंबईतही खाली घसरलेल्या किमान तापमानामुळे मुंबईकरही चांगलेच गारठले आहेत. महत्त्वाचे म्हणजे १ जानेवारी रोजी सांताक्रूझ आणि कुलाबा वेधशाळेत किमान तापमान अनुक्रमे १५.५ , १९.२ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. त्यामुळे मुंबईकरांची नववर्षाची सुरुवातच कमालीच्या थंडीने झाली आहे. दरम्यान, राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ८.४अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोकण, गोवा, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. मागील आठवड्याभरापासून मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमान खाली घसरले आहे. परिणामी सर्वत्र गारठा कायमआहे.मागील आठवड्यातील सोमवारीच मुंबईचे किमान तापमान आठवडाभर १७ अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार आठवडाभर मुंबईचे किमान तापमान १६ ते १८ अंशांदरम्यान नोंदविण्यात आले.पुढील पंधरवड्यात थंडी कायमविशेषत: सकाळी आणि रात्री वाहत असलेल्या गार वाºयामुळे मुंबईच्या थंडीत आणखीच भर पडत होती. यात उत्तरोत्तर वाढ होत गेली आणि१ जानेवारी रोजी मुंबईचे किमान तापमान १५ अंशांवर घसरले.मंगळवारसह बुधवारीही मुंबईचे किमान तापमान १६ अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. परिणामी मुंबईत पडलेली थंडी किमान पंधरवडा कायम राहण्याची शक्यता आहे.दरम्यान, १ ते ५ जानेवारी या कालावधीत राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
नववर्षाची सुरुवात थंडीने, मुंबई १५ अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 5:24 AM